बेकायदा बांधकामे पाडली
By Admin | Published: May 13, 2016 01:30 AM2016-05-13T01:30:17+5:302016-05-13T01:30:17+5:30
अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कडक पावले उचलली आहेत
पुणे : अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कडक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून मौजे उंड्री येथील मुरलीकृष्णा नागभूषणराव मंडविली आणि सॅम्युअल मॅनीवर या दोन इमारतीतील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. बांधकाम व अकृषक परवानगी न घेता बांधकामे सुरू असल्याने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ती पाडण्यात आली.
पीएमआरडीएच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने शहरालगतच्या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये एमआरटीपी कायद्यानुसार बांधकाम परवानगी देणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व कारवाई करण्याचे अधिकार आता पीएमआरडीएकडे आले आहेत.
या कायद्याचा आधार घेत पीएमआरडीएने उपनगरांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या.
यामध्ये उंड्री येथील कानडेनगर २८/२/अ येथील सॅम्युअल मॅनवर, मुरलीकृष्णा नागभूषणराव मंडविली आणि तुकाराम घुले यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आंबेगाव येथील सर्व्हे नंबर ६०/१ मिलिंद शिवाजी निगडे यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)४पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे, नोटिसा देणे आणि कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पथकांच्या वतीने महिन्यापूर्वी उंड्री, आंबेगाव परिसरातील अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही सर्व्हे नंबर, गटांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे असल्याचे निदर्शनास आले.
४एमआरटीपी कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन अनधिकृत बांधकाम करणारे जागामालक, विकासक आणि बांधकाम व्यावसायिक यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसांना समाधानकारक उत्तर न देणाऱ्या जागामालक, बिल्डरांवर एमआरडीपी कायद्याचे कलम ५२, ५३ आणि ५४ च्या आधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले.