रेल्वे स्थानकावर बेकायदा वसुली
By admin | Published: May 13, 2016 01:29 AM2016-05-13T01:29:08+5:302016-05-13T01:29:08+5:30
लगबग आणि घाईगडबडीत पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वाहनचालकांची अक्षरश: लूट सुरू असून, पार्किंगवाल्यांच्या मुजोरी आणि मनगटशाहीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे
पुणे : लगबग आणि घाईगडबडीत पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वाहनचालकांची अक्षरश: लूट सुरू असून, पार्किंगवाल्यांच्या मुजोरी आणि मनगटशाहीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सहा तास किंवा त्याच्या भागांसाठी असलेल्या शुल्काची अवाच्या सवा रक्कम उकळून पार्किंगचालक स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी; तसेच घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यासोबत दैनंदिन कामकाजाकरिता रेल्वेने प्रवास करणारेही या ठिकाणच्या पार्किंगमध्ये वाहने लावून जातात. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी स्वतंत्र वाहनतळ असून, प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटो रिक्षा व कॅबसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. याखेरीज खासगी वाहनांना रेल्वे स्थानकाच्या कोणत्याही भागात वाहने लावण्यास सक्त मनाई आहे. जर कोणी वाहन लावलेच, तर वाहनतळावरील मुजोर कर्मचारी ही वाहने हुसकावून लावतात. त्यांच्याशी कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याला मारहाण करायलाही मागेपुढे पाहिले जात नाही.
वाहनतळावर दुचाकी लावायची असल्यास सहा तासांसाठी २० रुपये आणि चारचाकी लावायची असल्यास चार तासांसाठी २० रुपये आकारण्यात येतात. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या प्रवासी, नागरिक आणि वाहनचालकांना अवघ्या काही मिनिटांचेच काम असते. वाहन लावून जाताना पावती दिली जाते. त्यावर वाहन आल्याची वेळ लिहिण्यात येते. काम संपवून वाहनचालक परत आला की, त्याला पावती परत देऊन पैसे चुकते करावे लागतात. अवघ्या काही मिनिटांसाठी २० रुपये द्यावे लागत असल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करतात; मात्र त्याचा येथील कर्मचाऱ्यांवर काहीही परिणाम होत नाही.
वाहनतळावर वाहने लावताना दोन वाहनांमधील अंतर खूपच कमी असते. अनेकदा वाहन लावताना शेजारच्या गाडीचे नुकसान होते. विशेषत: दुचाकींचे इंडिकेटर आणि आरसे तुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. चारचाकी गाड्या अगदी जवळजवळ उभ्या केल्यामुळे एकमेकांना घासण्याची शक्यता असते. वाहनाचे नुकसान झाल्याबाबत जाब विचारला, तर ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर देऊन वाहनतळावरील कर्मचारी मोकळे होतात. वाहनचालकाने भांडण्याचा प्रयत्न केलाच तर तेथे बसलेले पाच-सहा जण एकदम अंगावर जाऊन वाद घालू लागतात.
दिवसभरामध्ये पुणे रेल्वे स्थानकावर दोन हजारांपेक्षा अधिक वाहनांकडून पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. सहा तासांसाठी २० रुपये आकारले जात असले, तरी सहा तासांपेक्षा कमी वेळ वाहन लावल्यास शुल्क रक्कम कमी केली पाहिजे. कोणतेही वाहन सहा तास उभे केले जात नाही. त्यामुळे ते वाहन निघून गेले की, पुढच्या वाहनाकडून पुन्हा सहा तासांचे पैसे वसूल केले जातात. पंधरा मिनिटांमध्ये बारा तासांचे पैसे दोन वाहनांकडून वसूल केले जात आहेत. वाहनचालकांचा नाईलाज असल्यामुळे त्यांच्यापुढे पर्याय नसतो.
याबाबत लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार करायला गेले, तर पोलिसांकडूनही नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. रेल्वे स्थानकावरची वाहनतळावरची ही लूट थांबणार कधी, हाच प्रश्न आहे. आमची जबाबदारी नाही
वाहनतळावर लावलेल्या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असे वाहनतळचालक सांगतात; तसेच वाहनांचे काही नुकसान झाल्यास, आम्ही जबाबदार नाही, असेही पावतीवर लिहितात. जर वाहनचालकांना जबाबदारीच घ्यायची नसेल, तर मग पैसे कशाचे आकारले जातात, हा प्रश्न आहे. पावतीवर वाहन लॉक करून जावे, असे लिहिलेले असले, तरी दुचाकींना मात्र लॉक लावू दिले जात नाही. पुणे स्टेशनवरच्या वाहनतळावर मिळणाऱ्या पावतीवर, तर रेल्वे प्रशासन कोणत्याही नुकसानीस जबाबदार नसल्याचे नमूद केलेले आहे, तर कॅन्टोन्मेंटच्या पावतीवरही अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट प्रशासन स्वत:च्या जागा ठेकेदारी पद्धतीने वाहनतळासाठी देते. त्यासाठी ठेकेदाराकडून शुल्क वसूल केले जातात. त्यानंतर ठेकेदार वाहनचालकांच्या खिशाला कात्री लावतात. पैसे घेऊनही वाहनांची जबाबदारी घ्यायला वाहनतळचालक तयार नसतील, तर पैसे कशाकरिता आकारले जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.