बेकायदेशीर वाळूचा धंदा तेजीत
By admin | Published: May 7, 2015 04:51 AM2015-05-07T04:51:06+5:302015-05-07T04:51:06+5:30
राहूबेट (ता. दौंड) येथे सुरू असलेली बेकायदेशीर वाळूतस्करी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राहू : राहूबेट (ता. दौंड) येथे सुरू असलेली बेकायदेशीर वाळूतस्करी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या ठिकाणी लिलावच झाले नाहीत, अशा ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक राजरोसपणे वाळू काढीत आहेत. अशा वाळूतस्करांना आता आवर घालण्याची वेळ आली आहे.
महसूल विभागाचे अधिकारी वाळूतस्कारांमुळे राजकीय बळी ठरणार, असे चर्चिल जात आहे. एकीकडे, लाखो रुपये खर्च करून लिलाव धारकांनी लिलाव घेतले; परंतु त्यांना महसूल विभागाकडून या ना त्या कारणाने लगाम लावला जात असल्याचे बोलले जाते. परंतु, वाळूतस्कर मात्र राजरोसपणे शासनाला एकही पैसा न भरता वाळूचा मलिदा लाटत असल्याची वस्तुस्थिती आहे.
याबाबत महसूल विभागाचे अधिकारी कार्यवाहीसाठी गेले, तर राजकीय दबावापुढे त्यांना वेळप्रसंगी धाक दाखविला जातो, असे अधिकारीवर्गात बोलले जाते. काही ठिकाणी यांत्रिकी बोटीची परवानगी नसताना वाळूतस्कर व वाळू ठेकेदार राजरोसपणे वाळू काढत आहेत.
या वाळूतस्करांमुळे नदीपात्रातील जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बहुतेक ठिकाणी वन विभागाच्या जागेमध्येच वाळूतस्करांनी आधुनिक यंत्रसामग्री लावून वाळूउपसा सुरू ठेवला आहे. (वार्ताहर)