पुणे : आपल्या कामातून निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही म्हणून काम करतात असे काहीजण सांगतात. पण वेळ काढण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अॅक्टिव्ह पर्सन’...अशा शब्दांत अभिनेते आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांनी एकप्रकारे एफटीआयआयमध्ये कायमच सक्रीय राहाणार असल्याचे संकेत दिले. एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टरक्लास’ घेतला. या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, चंदीगढ डिपार्टमेंट इंडियन थिएटरसारख्या संस्थेमधून जे काही शिकलो. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा मध्ये तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एफटीआयआयमध्ये काही काळ घालवले. शिक्षण घेतल्यानंतरही सहा महिने काम मिळविण्यासाठी रस्त्यांवर भटकत होतो. आपल्याला काम मागणे किती गरजेचे आहे. त्यासाठी संघर्ष कसा करायचा हे सांगणेही तितकेच महत्वाचे आहे. एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो. जीवनात जो काही अनुभव घेतला जे शिकलो ते आज शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना सांगताना नक्कीच आनंद होत आहे. आजवरचे जे अध्यक्ष झाले त्यांना संस्थेसाठी म्हणावा तेवढा वेळ देणे शक्य झाले नाही. तुम्ही कसा वेळ काढणार आहात? याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते पुढे म्हणाले, मास्टर क्लास के बाद मै आप से बातचीत कर रहा हूं ना! आजोबा नेहमी म्हणायचे, व्यस्त असलेल्या माणसाकडेच कामासाठी नेहमी वेळ असतो. एखाद्या माणसाला काहीतरी करायची इच्छा असेल तर तो काम शोधून काढतोच. मी ३३ वर्षात ५८८ चित्रपट केले आहेत. देशविदेशात काम केले आहे. अध्यक्षपदी काम करताना मला विद्यार्थ्यांच्या थोडीच डोक्यावर बसायचे आहे. बाहेरच्या देशामधून मी जे काही शिकेन त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनाच होईल. आजकालच्या मुलांना पालक थोडीच शेजारी बसून हे करा, हे करू नका सांगतात. भैय्या एक मिनिट मैं बोलो ना, जो भी कुछ बोलना है, हमे बेवकुफ मत समझो एवढीच मुलांची इच्छा आहे, इथे बसून मला तपस्या थोडीच करायची आहे. २०१६ च्या अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी टाकला ‘मास्टर क्लास’वर बहिष्कारएफटीआयआय प्रशासनाकडून अभ्यासक्रमांमधील जाचक नियमांच्या विरोधात २०१६ च्या बॅचमधील काही विद्यार्थ्यांनी ‘व्हिसडमट्री’ येथे बॅनर लावून आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासनाकडे विद्याथर््यांनी आपल्या मागण्यांचा पाढा वाचला आहे. मात्र प्रशासन ढिम्मच आहे असे विद्याथर््यांचे म्हणणे आहे. अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना मास्टर क्लासला बसण्यासाठी विचारले असता विद्यार्थ्यांनी बसण्यास नकार दिला. त्यावर भाष्य करताना रंगमंचावर काम करताना समोर काही जागा रिकाम्या दिसतात. पण हे विद्यार्थी माझे आहेत असे मी समजतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्याचा नक्की प्रयत्न करेन असे खेर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांबरोबर प्रशासनाने चर्चा केली आहे. त्यांच्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. अनुपम खेर यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एक मिटींग झाली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हीही आशावादी आहोत.- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय