मुठा नदीपात्रात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला मेट्रो जबाबदार : जलसंपदा विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:36 PM2021-05-24T14:36:26+5:302021-05-24T15:23:02+5:30
नदीपात्रातील भराव तात्काळ काढा: जलसंपदा विभागाचे महामेट्रोला पत्र
पुणे : 'पुणे महामेट्रो'नेनदीपात्रात टाकलेला भराव मुदत संपली तरी काढलेला नाही. यामुळे जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्व जबाबदारी मेट्रोची राहील असा इशारा जलसंपदा विभागाने मेट्रोला दिला आहे. तसेच या संदर्भात काही कायदेशीर पावले उचलली गेली तर त्यालाही मेट्रोच जबाबदार असेल असेही सांगितले आहे. दरम्यान हा भराव तात्पुरताच असतो आणि पावसाळ्यापूर्वी तो काढला जातोच असा दावा मेट्रो ने केला आहे.
पुणे शहरात मेट्रोचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यातला नदीपात्रातील कामाचा टप्पा आता सुरू झाला आहे. यासाठी डेक्कन परिसरासोबतच मुळा मुठा संगमाजवळ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयाजवळ महामेट्रो कडून भराव टाकण्यात येत आहे. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन हा भराव काढून टाकणे अपेक्षित असते. मात्र मे महिना संपत आला तरी हा भराव काढला गेलेल नाही. त्यामुळे हे भराव तातडीने काढून टाकावेत अशी सूचना जलसंपदा विभागाने पत्राद्वारे केली आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हे भराव दोन मीटर पेक्षा जास्त उंचीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भरावामुळे नदीचा पूरवहन क्षेत्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्भात हरित लवादाकडे काही केस झाल्यास त्याची जबाबदारी महामेट्रोची राहील असे पत्रात म्हणलं आहे.
दरम्यान महामेट्रो चे संचालक व जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे म्हणाले ," नदीपात्रातील काम करण्यासाठी तात्पुरता भराव टाकावा लागतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तो काढून घेतला जातो व पावसाळा संपला की परत टाकला जातो. काम संपले की हा भराव कायमस्वरूपी काढून टाकतात. आतापर्यंत ८० टक्के भराव काढला आहे. १५ जूनपूर्वी तोही काढून टाकण्यात येईल."