पुणे : सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने, वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च गुणवत्ता असलेली शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, प्रिसिजन मेडिसिन, त्रिमितीय छपाई, टेलीमेडिसिन यासह अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. आपल्या सैनिकांना उत्तम आराेग्य व लढाईसाठी सदैव तत्पर राहण्यासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महत्वपूर्ण याेगदान देत आहे. त्यामुळे आपल्या तीन्ही सेवांमधील कर्मचाऱ्यांवर केले जाणारे वैद्यकीय उपचार उच्च दर्जाचे असावेत, याबाबत दक्षता बाळगली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील संशाेधनावर भर देण्याचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे एएफएमसी समाेर आव्हान असल्याचे मत राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी (१ डिसेंबर) वानवडी परिसरातील सशस्त्र सैना वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) राैप्य महाेत्सवी वर्षानिमित्त ‘प्रेसिडंट कलर’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राष्ट्रपती बाेलत हाेत्या. यावेळी आभासी पद्धतीने ‘प्रज्ञा’ या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषध उपचार केंद्राचे उद्घाटन देखील राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. एएफएमसीचे कमांडट लेफ्टनंट जनरल नरेंद्र काेतवाल यांची यावेळी उपस्थिती हाेती.
राष्ट्रपती मुर्म म्हणाल्या की, या संस्थेतून पदवीधर झालेल्यांनी युद्ध, बंड विरोधी कारवाया, नैसर्गिक आपत्ती तसेच महामारीच्या काळात, देशांतर्गत तसेच सीमापार भागात समर्पित सेवेद्वारे देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अनेक माजी विद्यार्थ्यांना कीर्ती चक्र, वीर चक्र, सेना व नाैसेना पदकने सन्मानित करण्यात आले आहे. एएफएमसीच्या माध्यमातून पदवी प्राप्त करुन अनेक महिला कॅडेट्सने सशस्त्र दलाच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय याेगदान दिले आहे. या महिलांकडून प्रेरणा घेऊन, अधिकाधिक महिला सशस्त्र दलांमधील कारकीर्द निवडतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एएफएमसी मधील माजी विद्यार्थी पुनीता अराेडा या देशातील लष्कराच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल बनल्या. तसेच भारतीय वायू दलात पहिली एअर मार्शल हाेण्याचा मान माजी छात्र पद्या बंदाेपाध्याय यांना मिळाला आहे. हीच परंपरा पुढे देखील यशस्वीपणे चालू राहील. आपल्या सेनेने सदैव अद्भुत साहस व काैशल्याच्या जाेरावर देशाचे रक्षण केले आहे. त्याचसाेबत देशाच्या विकासासाठी शांततेचे वातावरण ठेवण्याचे काम देखील ठेवण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
यासह देशाचे सैनिकांचे आराेग्य याेग्य ठेवण्याची जबाबदारी मेहनतीने आगामी काळात देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पार पाडावी. काेराेना काळात एएफएमसी मधील ज्या महिला व पुरुषांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक काम केले त्यांचा देशाला अभिमान आहे. देशवासी तुमची सेवा व साहस हे सदैव लक्षात ठेवतील, असेही त्यांनी नमूद केले.