महत्त्वाची बातमी! आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 10:09 AM2022-11-08T10:09:02+5:302022-11-08T10:10:17+5:30
शहरी मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी अनास्था असल्याने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम पुण्यात होत...
पुणे : १८ वर्षांची वयाची अट पूर्ण केलेल्या नवमतदारांना वर्षातून केवळ एकदा मतदार नोंदणी करता येत होती. आता ही नोंदणी वर्षातून ४ वेळा होणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ देशपातळीवर पुण्यातून होणार असून, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ९) होणार आहे. शहरी मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी अनास्था असल्याने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम पुण्यात होत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृतीसाठी ९ नोव्हेंबरला बालेवाडी येथे सकाळी ६:३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन केले असून, यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, नेमबाज अंजली भागवत, ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, काका पवार, शांताराम जाधव, राहुल आवारी, मारुती आडकर, निखिल कानेटर आदी खेळाडूही उपस्थित राहणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उद्योग क्षेत्रातील कामगारांचा निवडणूक प्रकियेत सहभाग वाढविण्यासाठी हिंजवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योग संस्थांमध्ये स्थापन मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
५ जानेवारीला अंतिम मतदार यादी
पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या शनिवार व रविवार विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.
आगाऊ मतदार नोंदणीही
१ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर असे अर्हता दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करू शकतील.