पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास मेट्रो सुरु करण्यात आली होती. पुणेकरांनी अतिशय उत्साहात मेट्रोने प्रवास केल्याचे दिसून येत होते. पहिल्याच दिवशी फक्त ५ तासात तब्बल २२ हजार पुणेकरांनी प्रवास केला होता. त्यावेळी ४ लाख ६६ हजार ४६० एवढी पुणे मेट्रोची कमाई झाली होती. त्यानंतर दररोज असंख्य पुणेकर मेट्रोने प्रवास करू लागले. पुण्यात मेट्रो नवीन असल्याने नागरिकांचा उत्साह वाढतच चालला होता. सहा मार्च पासून अवघ्या ८ दिवसात मेट्रोला २ लाख २७ हजार ९५० प्रवासी मिळाले. त्यांच्याकडून मेट्रोला ३२ लाख ४५ हजार ६७३ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
२०१४ साली पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. तर २०१६ साली मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव मिळाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य नागरिक मेट्रोने प्रवास करण्यासाठी अजूनही येत आहेत. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे.
रविवारी एका दिवसात १० लाखांचे उत्पन्न
रविवारी सुटीच्या दिवशी ( दि. १३) मेट्रोमधून ६७३५० नागरिकांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला एकाच दिवशी १०,०७,९४० रुपये उत्पन्न मिळाले. मेट्रोला नागरिकांचा पुणे व पिंपरी - चिंचवड अशा दोन्ही शहरांमध्ये वाढता प्रतिसाद आहे. पुण्यात वनाज ते गरवारे व पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी ते फुगेवाडी या मार्गांवर शालेय मुलांपासून ते व्रुद्ध व्यक्ती तसेच समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक मेट्रो सफारीचा आनंद लुटत आहेत. मेट्रोचे पुढील मार्ग काम पूर्ण होऊन त्वरीत सुरू व्हावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड मोबाईलमध्ये असणाऱ्या प्ले स्टोर मधून (pune metro app) उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते अँप वापरण्यासाठी अँपमध्ये स्वतःची माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यातच तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागणार आहे. म्हणजे नेहमी अँप उघडताना तो पासवर्ड टाकावा लागेल. अँपमध्ये सध्या सुरु असलेल्या स्टेशनची नावेही देण्यात आली आहेत. नागरिकांना सिंगल आणि रिटर्नचे तिकीटही काढता येणार आहे. मेट्रोच्या तिकिटाप्रमाणेच प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या तिकिटाचा कोड स्कॅन करावा लागणार आहे. हे मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड मेट्रो पटशासनाकडून सांगण्यात आले आहे.