पुणे : हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी, खेड लोकसभा मतदार संघातील इंद्रायणी मेडिसीटी प्रकल्प, भीमा कोरेगाव विजयस्तंभ,रिंगरोड प्रकल्पासाठी 1 हजार 500 कोटीची तरतूद, नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासोबतच भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा विकास आराखडा तयार करणे, अष्टविनायक विकासासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेल्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला झुकते माप दिले आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार (दि.11) रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातच महाराष्ट्राची अस्मिता, स्फुर्तीस्थान, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक व तुळापूर या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरविले असल्याचे जाहीर केले. त्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून २५० कोटी रुपयांची तरतूद केली. दरम्यान पुणे शहराजवळ ३०० एकर जागेमध्ये अत्याधुनिक 'इंद्रायणी मेडिसीटी' उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजीओथेरपी केंद्र उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल असे देखील पवार यांनी स्पष्ट केले. परंतू तरतूद मात्र केली नाही. मौजे पेरणे फाटा येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभ व सोयी सुविधायुक्त स्मारक व परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येतील. यासाठी आवश्यक असेल तशी तरतूद करण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे- रिंगरोड प्रकल्पासाठी सुमारे १ हजार ९०० हेक्टर जमिनीचे प्रकल्प संपादन करावयाचे असून, त्याकरिता १ हजार ५०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. नाशिक-पुणे ८३. नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाला केंद्र शासनाची मान्यता मध्यम मिळाली आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ८० टक्के भार राज्य शासन उचलणार आहे. मुंबई-जालना-नांदेड रेल्वे हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तर अष्टविनायक मंदिरांच्या सर्वांगीण विकास आराखड्याकरिता ५० कोटी विकास आराखडा रुपये उपलब्ध करून देण्यात आली आहे.