...तर महाराष्ट्रात दलित पँथरचे सरकार असते : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 08:27 AM2022-08-26T08:27:34+5:302022-08-26T08:29:21+5:30
पुण्यात बोलताना आठवलेंनी मांडले मत...
पुणे : दलित पँथर ही अन्याय-अत्याचारविरोधी आणि दलितांसाठी काम करणारी चळवळ होती, ती जगभरात पोहोचली होती. चळवळ एकसंध राहिली असती तर महाराष्ट्रात पँथरचे सरकार आले असते, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंच येथे आयाेजित पँथर सन्मान पुरस्कार साेहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, विचारवंत अविनाश महातेकर, ज्येष्ठ साहित्यिक व दलित पँथरचे सदस्य अर्जुन डांगळे, दिलीप जगताप, सुखदेव सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, रिपाइं शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र मोरे, आयुब शेख, महिपाल वाघमारे, भगवान वैराट आदी उपस्थित होते.
यावेळी दिवंगत माजी उपमहापौर पँथर नवनाथ कांबळे, रवींद्र गांगुर्डे, चिंतामण कांबळे यांना दिवंगत पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर पँथर चळवळीत योगदान देणारे भगवान वैराट, अंकल सोनवणे, बाबूराव घाडगे, वसंत बनसोडे, प्रतिभाताई गायकवाड आदींसह पँथर चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या पँथर कार्यकर्त्यांना पँथर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन परशुराम वाडेकर यांनी केले, तर आभार शैलेश चव्हाण यांनी मानले.
माजी मंत्री चंद्रकात हांडोरे म्हणाले, ‘सर्वांनी आपल्या चुका दुरुस्त करून दलित समाजाच्या विकासासाठी आणि प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा उभारला तर आजही पँथर पुन्हा उभी राहू शकते.’
ज्येष्ठ साहित्यिक व दलित पँथरचे संस्थापक सदस्य अर्जुन डांगळे म्हणाले, ‘दलित पँथरचा झंजावात बघून मला आफ्रिकेत बोलावून प्रत्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या हस्ते सत्कार केला गेला, तो सन्मान माझा नसून पँथर कार्यकर्त्यांचा होता. ही चळवळ देशातच नव्हेतर, जगभरात पोहोचली होती. जगभरात पँथर ही एकमेव चळवळ होती की जी लेखकांनी उभारली होती. या चळवळीचे नेतृत्व लेखक, कवी, साहित्यिक करीत होते.’
स्मारकासाठी प्रयत्न करू
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या मूळ गाव कण्हेर पुणे आणि राजा ढाले यांच्या सांगली या ठिकाणी स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.