एक लाख कमावण्याच्या नादात साडेपाच लाख गमावले
By भाग्यश्री गिलडा | Published: December 10, 2023 03:03 PM2023-12-10T15:03:46+5:302023-12-10T15:04:01+5:30
एका महिलेने तुम्ही घरबसल्या डिजिटल मार्केटिंग करून १ लाख रुपये कमावू शकतात असे सांगितले
पुणे: दर महिन्याला १ लाख रुपये कमावण्याच्या आमिषाला बळी पडून एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार वडगाव शेरी परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार महिलेला अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. अंजली नामक महिलेने तुम्ही घरबसल्या डिजिटल मार्केटिंग करून १ लाख रुपये कमावू शकतात असे सांगितले. त्यानंतर वेगवगेळी टास्कची माहिती देऊन तुम्ही कोणता टास्क निवडला असे सांगितले. महिलेने १५० रुपयांचा टास्क निवडल्याचे सांगितले. त्यानंतर एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून १५० रुपयांचा टास्क देण्यात आला. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून महिलेला ५ लाख ४७ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मिळालेला नफा दिसत होता मात्र प्रत्यक्षात पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक लांडगे करत आहेत.