Pune Rain: रात्रीच्या पावसात पुणे पाण्यात! शहरातील रस्त्यांवर समुद्राच्या लाटांप्रमाणे पाण्याचे लोंढे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:27 AM2022-10-18T10:27:13+5:302022-10-18T10:27:23+5:30
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस असाच पाऊस पडण्याचा अंदाज
पुणे : शहराला सोमवारी रात्री अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार, हाॅकर्स यांच्यासह स्थानिकांचे हाल झाले. यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे लहान लेकरांना साेबत घेऊन आलेल्या कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. त्यातच विजांचा कडकडाट झाल्याने मुले घाबरत हाेती. अनेक जण जीव मुठीत घेऊन आडाेसा शाेधत हाेते. या पावसाने रस्त्यांवर पुन्हा पाणीचपाणी झाले. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस असाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, शहरात काल सकाळपासूच ढगाळ वातावरण होतो. काहीकाळ वातावरण मोकळे होऊन ऊन पडले मात्र, सायंकाळी पुन्हा ढगांची गर्दी वाढली. रात्री ९ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरींसोबत ढगांचा गडगडाटही सुरूच होता. शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, हडपसर, सिंहगड रस्ता भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. असाच पाऊस पिंपरी चिंचवड परिसरातही सुरू होता.
सोमवार पेठेत मीटर बॉक्स शॉर्टसर्किट झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगरमधील अंबामाता मंदिर तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. हडपसरमधील आकाशवाणीजवळ एक झाड पडले.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले की, अरबी समुद्रावरून राज्यावर येणारे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पुन्हा पावसाचे असेच प्रमाण असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन पाऊस कमी होईल.
हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार रात्री साडेअकरा वाजता शहरात झालेला पाऊस : शिवाजीनगर, लोहगाव, मगरपट्टा, चिंचवड, लवळे
पेठांमध्ये पाणीच पाणी
- शहराच्या मध्य भागात रात्री साडेनऊनंतर जोरदार पावसाला सुरुवात
- शिवाजी रोड, बाजीराव रस्त्यासह मध्य वस्तीतील रस्ते पाण्याखाली
- खरेदीसाठी उशिरापर्यंत बाजारपेठेत थांबलेले ग्राहक पावसात अडकले
- अनेक दुकानात पाणी शिरले
- ग्राहकांसह कामगारांची धावपळ
- रस्त्यावर गुडघाभर पाणी
- अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
- हडपसरसह पूर्व भागात प्रचंड पाऊस
रात्री ११ वाजेपर्यंत (आशय मेजरमेंट)
कात्रज आंबेगाव -३१.४ मि.मी.
वारजे - २९ मि.मी.
एमआयटी लोणी - ६२.४ मि.मी.
सिंहगड रोड, खडकवासला - ० मि.मी.