आरोग्याच्या दक्षतेबाबत महिलांमध्ये अनास्था

By admin | Published: May 28, 2016 04:23 AM2016-05-28T04:23:41+5:302016-05-28T04:23:41+5:30

शहरातील महिला आहाराविष़यी जागृत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारीत व्यस्त राहिल्याने त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायाम, सकाळी चालणे यांमध्ये

Inadequate women in health care | आरोग्याच्या दक्षतेबाबत महिलांमध्ये अनास्था

आरोग्याच्या दक्षतेबाबत महिलांमध्ये अनास्था

Next

- किरण माळी,  पिंपरी
शहरातील महिला आहाराविष़यी जागृत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारीत व्यस्त राहिल्याने त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायाम, सकाळी चालणे यांमध्ये नियमितता नाही. आपल्या घराप्रमाणे परिसर स्वच्छतेविषयी जागरूक नाहीत. उच्चशिक्षित असूनही शारीरिक तक्रारी व आजाराकडे ६० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांचे दुर्लक्ष आहे. नियमित आरोग्य तपासणीविषयी महिलांमध्ये अनास्था आहे.

जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील साधारणत ५० ते ६० महिलांच्या आरोग्याबाबत ‘लोकमत’तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योगनगरीत अनेक महिला नोकरी करणा-या आहेत. रोजच्या धावपळीच्या काळात नोकरदार महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
महिलांच्या आहाराविषयक जागरूकता, सहज व सोपे व्यायामप्रकार, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, नियमित आरोग्य तपासणी, तसेच आरोग्यविषयक समस्या यांबाबत माहिती घेण्यात आली.
या वेळी महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, आरोग्य जपण्याच्या दृष्टीने महिलांमध्ये अनास्था असल्याचे निदर्शनास आले आहे. आहाराविषयी महिला किती जागरूक आहेत, यासंबंधी माहिती घेतली.
या वेळी सुमारे ५२ टक्के महिला आरोग्याच्या दृष्टीने सकस आहाराबाबत अनभिज्ञ आहेत. उर्वरित ४८ टक्के महिलांनी सकारात्मक उत्तरे दिली. त्यातून किमान आरोग्याच्या बाबतीत चौकस आहार, तसेच जेवण तयार करण्याच्या पद्धतीत बदल केल्याचे सांगितले.
व्यायाम व चालणे या संदर्भात महिलांचे मत जाणून घेतले असता ७२ टक्के महिला व्यायाम करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, व्यायामामध्ये अनियमितता आहे. व्यायाम करणा-या महिलांमध्ये २० टक्के योगासने, १२ टक्के जीममध्ये जात असल्याचे आढळले.
सकाळी किंवा संध्याकाळी बागेत चालणाऱ्या महिलांचे प्रमाण ४० टक्के असल्याचे दिसून आले. जवळपासच्या महिला एकत्र येऊन चालण्याकडे महिलावर्गाचा कल असल्याचे दिसून आले.
यामध्ये सुमारे २८ टक्के महिला या ना त्या कारणाने कोणताच व्यायामप्रकार करत नसल्याचे आढळले. घरगुती कामे तसेच व्यस्त दिनचर्या यांमुळे वेळच नसल्याचे प्रमुख कारण महिलांनी ‘लोकमत’ सर्व्हेक्षणावेळी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध होणे हा ऐरणीचा विषय असल्याने याबाबत मते घेतली असता ६४ टक्के स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.
३६ टक्के महिलांनी कामाच्या ठिकाणी किंवा मोठ्या संस्थांमध्येच सुविधा असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध असतील, तेथे पुरेशी स्वच्छता नसते. तेथील वातावरण सुरक्षित नसते. त्यामुळे स्वत:च सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छतागृह वापरण्याचे टाळत असल्याचे महिला सांगतात.
महिलांमधील विविध आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी विचारले असता रक्ताक्षयाचे प्रमाण महिलांमध्ये लक्षणीय आहे. त्यानंतर रक्तदाब, मधुमेह, तसेच थायरॉईडसारख्या समस्या महिलांमध्ये आहेत. मुळात काहीच आरोग्य समस्या नाहीत, शारीरिक व्याधी नाहीत, त्यामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे.
(प्रतिनिधी)

स्वत:च्या आरोग्याबाबत
‘ती’उदासीन

कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली स्त्री तिच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे वास्तव आहे. कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक बांधणी असलेली उत्कृष्ट दिनचर्या अभावानेच आहे, असे वास्तव आहे. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, कौटुंबिक स्वास्थ्य जपणारी ‘ती’ स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत उदासीन आहे.
- आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात वेळ मिळत नसल्याची सबब
- सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत कुचंबणा
- रक्ताक्षयाचे प्रमाण लक्षणीय
- नियमित आरोग्य तपासणी करण्याकडे दुर्लक्ष

Web Title: Inadequate women in health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.