दौंडमधील उर्वरित गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:02+5:302021-09-07T04:15:02+5:30
खोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण योजनेच्या आराखड्यात दौंड तालुक्यातील समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांनाही प्राधिकरणात समाविष्ट करा, अशी ...
खोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण योजनेच्या आराखड्यात दौंड तालुक्यातील समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांनाही प्राधिकरणात समाविष्ट करा, अशी मागणी पुढे येत आहे. दौंड तालुक्यातील जवळपास ५१ महसुली गावांचा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
ज्या गावांना या योजनेची गरज आहे तीच गावे सध्या या योजनेपासून वंचित राहिली आहेत. पुण्यापासून पुणे-सोलापूर रस्त्याच्या डावीकडून उत्तर भागातील गावांचा या योजनेच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. महसुली ५१ गावांमधील ही बागायती भागातील गावे त्यामध्ये येत आहेत. मात्र, दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर रोडच्या दक्षिण भागातील दुष्काळी पट्ट्यातील गावे या योजनेच्या आराखड्यातून वगळली गेली आहेत.
यामध्ये खोर, देऊळगावगाडा, कुसेगाव, पडवी ही गावे या पीएमआरडी योजनेच्या आराखड्यात येत नाहीत. या गावांना या पीएमआरडी योजनेचा फायदा सर्वांत मोठा असून, या भागातील गावांचा जर या योजनेच्या आराखड्यात समाविष्ट केला गेला, तर या दुष्काळी गावांचा कायापालट होऊन शासकीय योजनेचा लाभ घेता येईल हेही तितकेच खरे आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यामध्ये लक्ष घालून दौंड तालुक्यातील राहिलेल्या उर्वरित दक्षिण भागातील गावांचा या पीएमआरडी योजनेत समाविष्ट करण्याच्या बाबतीत पाठपुरावा करण्याची मागणी पुढे आली आहे.
शासकीय योजनेच्या आराखड्यात ५१ गावे ही पश्चिम भागातील असून, या योजनेचे क्षेत्रीय कार्यालय यवत या ठिकाणी व्हावे अशी मागणी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जर दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांचा या योजनेत समाविष्ट केला गेला, तर भविष्यात यवत हे जर क्षेत्रीय कार्यालय जर झाले तर ही समाविष्ट नसलेले गावे या योजनेत घेतली गेली तर मध्यवर्ती होणारे यवत क्षेत्रीय कार्यालयापासून अगदी जवळ ही गावे आहेत. याबाबत माहिती देताना देऊळगावगाडा चे माजी सरपंच डी. डी. बारवकर म्हणाले की, देऊळगावगाडा ग्रामपंचायतच्या पूर्वेच्या शिवेवरती वरवंड या गावाचा पीएमआरडी समाविष्ट केलेला आहे. मग देऊळगावगाडा या गावाचा समाविष्ट होणे अनिवार्य आहे. या गावाच्या हद्दीत श्री क्षेत्र सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान बेट असून, या ट्रस्ट विकासाच्या दृष्टिकोनातून ही गावे समाविष्ट करणे महत्वपूर्ण आहे.
--
चौकट
दौंड तालुक्यातील दक्षिणपट्टा हा दुष्काळी छायेत येत असून या गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणे गरजेचे आहे. भविष्यात क्षेत्रीय कार्यालय यवत येथे झाले तर खोर हे गाव हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदने दिले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
नितीन दोरगे, सदस्य, पंचायत समिती दौंड