समाविष्ट गावांमुळे वाढली अकरावी प्रवेशक्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:37+5:302021-08-23T04:13:37+5:30
पुणे : पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन गावांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अकरावी प्रवेशाची क्षमता वाढली आहे. सध्या पुणे ...
पुणे : पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन गावांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अकरावी प्रवेशाची क्षमता वाढली आहे. सध्या पुणे महापालिका परिसरातील ३१० कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला असून, त्यात आणखी एक ते दोन महाविद्यालये वाढू शकतात. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशक्षमता सुमारे चार हजाराने वाढली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी १ लाख ७ हजार जागा उपलब्ध होत्या. मात्र, यंदा त्यात वाढ झाली असून सध्या १ लाख १० हजार ६०५ जागांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यातच काही शैक्षणिक संस्थांनी सेल्फ फाईन्स अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या जागांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
पालिका हद्दीत २३ नव्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशसुध्दा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. यंदा दहावीचा निकाल वाढला असला तरी अकरावीच्या जागाही वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे मागील वर्षी अकरावीच्या सुमारे ३५ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------------------