उरुळी कांचन : हवेली तालुक्यात गौणखनिज उत्खनन व वाहतुकीमध्ये झालेल्या दंडात्मक कारवाईची रक्कम संबंधित व्यक्तींनी न भरल्यास संबंधितांच्या सात-बारावरील मिळकतीमध्ये इतर हक्कामध्ये दंडात्मक बोजा तलाठी व मंडलाधिकारी यांना तातडीने नोंंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात संबंधितांना नोटीस काढून त्यांनी शासकीय थकबाकी न भरल्यास संबंधितांची सात-बारावरील मिळकत सरकारजमा करणार असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली आहे. तालुक्यात अलीकडे गौणखनिज व वाहतुकीचा दंड झालेल्या व्यक्ती सात-बारावर शासकीय थकबाकी असताना बेकायदा हस्तांतरित करण्याचे व्यवहार होत असल्याने महसूल विभागाने तातडीने संबंधितांना नोटीस बजावून दंडाची रक्कम न भरल्यास सात-बारावरील मिळकत सरकारजमा करणार असल्याचे पाऊल उचलले आहे. गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन व वाहतुकीला दंडाची कारवाई म्हणून संबंधित व्यक्तीकडून चालू बाजारभावाच्या पाचपट दंड आकारला जात आहे.तरीही तालुक्यात माती, मुरुम, दगडखाणी, वाळू या गौणखनिजाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. या ठिकाणी पंचनामा करून संबंधितांवर दंडाची कारवाई करूनही बेकायदा गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण कमी न झाल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित तहसीलदार यांच्या आदेशाविरुद्ध काही जण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागत आहेत. अशा वेळी संबंधितांंनी शासकीय दंडात्मक रक्कम विहित कालावधीत शासकीय तिजोरीत भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र बहुतांश हा गैरप्रकार करणारे गौणखनिजाबाबत दंड भरत नसल्याने तलाठी व मंडलाधिकारी यांना सात-बारावर बोजा नोंदविण्याकामी आदेश दिले आहेत. ............बेकायदा गौणखनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात कारवाई झालेल्या प्रकरणांत संबंधित व्यक्ती शासकीय रक्कम भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरीही काही जण या सातबारा उताऱ्यांचे बेकायदा हस्तांतर व्यवहार करून शासनाची फसवणूक करीत आहेत. महसूल जमीन अधिनियम कायद्यात असे हस्तांतरित व्यवहार झाले असतील, तर संबंधितांची मिळकत सरकारजमा करणार असल्याने संबंधितांनी खबरदारी घ्यावी. - सुनील कोळी, तहसीलदार हवेली
गौणखनिज दंड न भरल्यास मिळकत होणार सरकारजमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 1:33 PM
शासकीय थकबाकी न भरल्यास संबंधितांची सात-बारावरील मिळकत सरकारजमा करणार
ठळक मुद्देतहसीलदार सुनील कोळी । तलाठी व मंडलाधिकारी यांना दिल्या सूचना