पुणे विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ, बारामतीत १० टँकरने पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 07:28 PM2018-11-14T19:28:59+5:302018-11-14T19:35:37+5:30
परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे: दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने पुणे विभागात नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी (दि.१४) पुणे विभागात ४६ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून त्यात पुणे जिल्ह्यात १६ टँकर सुरू असून त्यातील १० बारामतीत पाणी पुरवठा करत आहेत. तसेच साताऱ्यात सर्वाधिक २६ टँकर सुरू आहेत. विभागातील ८४ हजार ४३७ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत.
परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनातर्फे दुष्काळी तालुक्यांची यादीही प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २५ आणि पुणे जिल्ह्यात १६ तर सांगलीमध्ये ३ आणि सोलापूर जिल्ह्यात २ टँकर सुरू आहेत. त्याचप्रमाणे विभागातील ११ हजार ७८५ जनावरे दुष्काळाने बाधित झाली असून त्यात साताऱ्यातील ९ हजार ९०४ आणि सोलापूरमधील १८८१ जनावरांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात सर्वाधिक १० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दौंडमध्ये १, पुरंदरमध्ये २, शिरूर तालुक्यात १ आणि जुन्नर तालुक्यात २ टँकर सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील १३ गावे आणि १४९ वाड्यामध्ये पाणी टंचाई आहे. तर साताऱ्यातील २८ गावे आणि १४२ वाड्या बाधित झाल्या असून माण, खटाव, कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. सांगलीत आटपाडीमध्ये आणि सोलापुरात माढा तालुक्यात नागरिक दुष्काळाने बाधित आहेत.