काकडी, कांदा, मिरचीच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:14 AM2018-04-30T04:14:05+5:302018-04-30T04:14:05+5:30
उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे तरकारी बाजारात भाजीपाल्याची अपेक्षित आवक झाली नाही. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आले, काकडी, श्रावण घेवडा, कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली
पुणे : उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे तरकारी बाजारात भाजीपाल्याची अपेक्षित आवक झाली नाही. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आले, काकडी, श्रावण घेवडा, कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. तर परराज्यांतून दाखल होत असलेल्या मटारचा दर्जा घसरल्याने मटारच्या दरामध्ये घट झाली. दरम्यान इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी बाजारात रविवारी (दि.२९) रोजी ५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. यात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशमधून २०० ते २५० पोती मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ते ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ७ ते ८ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १४०० ते १५०० पोती, टॉमेटो साडेपाच हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, मटार १५० ते १७५ गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गावरान कैरी १० ते १२, चिंच २० ते २५ पोती, कांद्याची ७० ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर, नाशिक आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ४५ ट्रक, भुईमूग ५० ते ६० पोती इतकी आवक झाली.
कलिंगड, खरबूज, डाळिंबाची मागणी वाढली
उन्हाच्या कडाक्यामुळे लाही-लाही होणारा जीव थंड करण्यासाठी फळबाजारात कलिंगड, खरबूज, डाळिंब, संत्रा, मोसंबी या थंडावा देणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक चांगली असल्याने या फळांचे दर स्थिर असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. यामध्ये केवळ कलिंगडच्या दरामध्ये किलोमागे २ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान चांगल्या दर्जाची लिंबे बाजारात येत नसल्याने मागणी असून देखील आकाराने लहान, हिरव्या लिंबांना उठाव कमी आहे. यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. रविवारी येथील फळबाजारात ७ ट्रक अननस, ४० टन मोसंबी, १० टन संत्री, २० ते २५ टन डाळिंब, १० ते १२ टेम्पो पपई, लिंबाची ३ ते ४ हजार गोणी
आवक झाली.
चाकणला काद्यांची
आवक घटली
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ५५० क्विंटलने घटून भावात १०० रुपयांची वाढ झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २५५० क्विंटल झाली. कांद्याला कमाल ९०० रुपये भाव मिळाला. बाजारात एकूण अडीच कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९३५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २८० क्विंटलने घटून बटाट्याला कमाल १६०० रुपये भाव मिळाला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक ४ क्विंटल होऊन शेंगांचा कमाल भाव ६००० रुपयांवर स्थिर राहिला. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल होऊन लसणाचा कमाल भाव २५०० रुपयांवर स्थिर झाला.
पालेभाज्यांचे दर वाढलेलेच
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुळा, चवळई, पालक वगळता पालेभाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात ५ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत आहे. किरकोळ बाजारात १५ ते २५ रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी कोथिंबिरीची सुमारे १ लाख, तर मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली.