पुणे : एखाद्या उत्पादनाचे मागणीपेक्षा जास्त उत्पादन झाल्यास बाजारपेठेतील त्या उत्पादनाचा भाव कमी होतो. हा मागणी आणि उत्पादनाचा सिध्दांत साखर उद्योगाला देखील लागु होतो. आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. सारखेच्या उत्पादनात भविष्य नसून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबरोबर असे मार्मिक भाष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई आयोजित साखर परिषद 20 - 20 च्या समारोपात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि च्या प्रशासकीय मंड्ळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
भविष्यातील साखर उद्योगाविषयी चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले, साखर कारखाने टिकविण्याकरिता त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळाची परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. उसाचे उत्पादन घेण्याकरिता पाण्याची नव्हे तर पाण्याच्या नियोजन आवश्यक आहे. साखर कारखानदारीच्या उद्योगात वाहतूक, मजुरांचे प्रश्न, उत्पादन खर्च याविषयक गंभीर समस्या आहेत. आपल्याला साखरेची नव्हे इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल. तसे झाल्यास शेतक-याचे भविष्य टिकून राहणार आहे. जितक्या प्रमाणात साखरेची निर्मिती होते तेवढी मागणी मात्र बाजारपेठेतून नसल्याने शेतक -यांची डोकेदुखी वाढली आहे. जे साखर कारखाने बंद पडले आहेत त्यांचा उपयोग इथेनॉलच्या निर्मितीकरीता करता येईल का, याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे. मात्र कारखानदारीच्या धोरणात आणखी बदल करताना त्यातील महत्वाच्या बाबी आता कारखानदारांनी लक्षात घ्याव्यात. जे बदलतील ते टिकतील जे केवळ उसाचे उत्पादन घेतील ईश्वर त्यांचे रक्षण करो. या शब्दांत गडकरी यांनी इथेनॉलचे महत्व पटवून दिले.
पुढील वर्षी किमान 40 ते 45 टक्के उसाचे उत्पादन घटेल अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पाण्याचे दुर्भिक्ष्य, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतल्यास परिस्थिती चिंताजनक वाटते. पूर्वी साखर कारखान्यांचा हंगाम हा 130 दिवसांचा होता. गेला हंगाम 126 दिवसांवर आला. यांची सरासरी काढल्यास 77 दिवसांवर हंगाम आला आहे. राज्यात होणारे एकूण उसाचे उत्पादन आणि कारखान्याचा हंगाम हा प्रश्न पवार यांनी मांडला. तसेच कारखान्याच्या मेंटेंनन्सचा खर्च प्रचंड आहे. तो तसाच राहिल्यास कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतून घटणारी मागणी, ठरलेला भाव न देणे यासारख्या कारणांमुळे शेतक-यांच्या मनात साखर उद्योगाविषयी भीती आहे.
ऊस नको बीट लावा..युरोपीय देशात गेलो असताना तिथे उस नव्हे बीट पासून साखर तयार करत असल्याचे पाहवयास मिळाले. बीट पाच ते सहा महिन्याचे पीक आहे. त्यातून 55 टक्के पाण्याची बचत होते. तसेच जमिनीची प्रतवारी वाढविण्याकरिता हे पीक महत्वाचे आहे. आपल्याकडे 100 टक्के बीटची लागवड होणार नाही. मात्र 4 महिने ऊस 3 महिने बीट असा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही. त्याचा परिणाम शेतक-याच्या फायद्याचा असेल. असे पवार यांनी यावेळी सांगितले.