महाविद्यालयांना मिळाल्या वाढीव तुकड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:14+5:302021-09-21T04:13:14+5:30
पुणे: इयत्ता बारावीच्या विक्रमी निकालामुळे प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांना राज्य शासन व ...
पुणे: इयत्ता बारावीच्या विक्रमी निकालामुळे प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांना राज्य शासन व विद्यापीठाकडून एका वर्षासाठी नव्या तुकड्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच काही महाविद्यालयांचे पहिले सत्र सुरू झाले असून, उर्वरित महाविद्यालयांकडून पुढील आठवड्यापासून ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा न घेताच जाहीर केलेल्या बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राज्याचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागला. परिणामी, प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने व विद्यापीठाने फर्ग्युसन महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर आदी महाविद्यालयांना नव्या तुकड्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला. जून महिन्यात प्रथम सत्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र,कोरोनामुळे सत्र सुरू होण्यास विलंब झाला.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सिंह परदेशी म्हणाले की, निकाल वाढल्याने विद्यार्थ्यांकडून प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळाला.कला शाखेच्या एका नवीन तुकडीस या वर्षासाठी मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयाचे ऑनलाईन वर्ग २७ सप्टेंबरपासून सुरू केले जाणार आहेत.
मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव म्हणाले, शासनाने तत्काळ बीबीए-आयबी आणि इंग्रजी माध्यम कला शाखेसाठी एका तुकडीस मान्यता दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठ आनुदान आयोगाच्या सूचनेनुसार नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सत्र घेतले असून ऑनलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरू केले आहेत.
स. प. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सविता दातार म्हणाल्या की, महाविद्यालयास कॉम्प्युटर सायन्ससाठी नवीन तुकडी मिळाली आहे. प्रवेशास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून लवकरच ऑनलाईन वर्ग सुरू केले जाणार आहेत.