पुणे : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार? नववी, दहावी व बारावीचे ऑफलाइन वर्गही बंद करण्याची वेळ आली, तर परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातील ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास ऑफलाइन परीक्षा घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात कोणताही संभ्रमात राहू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांचा निकाल मागील परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, यंदा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा देऊन तयार झालेला निकाल उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत. कोरोनाबरोबर जगण्याची जीवनशैली सवय सर्वांनी अंगीकारली पाहिजे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीचे वर्ग सध्या बंद केले आहेत. मात्र, दहावी-बारावीचे वर्ग बंद करू नयेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन किती गुण मिळतात. हे त्यांना समजले पाहिजे. तसेच सध्या कोरोना व ओमायक्रॉनमुळे मुलांना कोणताही त्रास होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे उचित होईल.
- गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक, शिक्षण संचालक
दहावी बारावीच्या परीक्षांना काही अवधी आहे. दरम्यानच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक दिली जाईल. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्यात अडचण येणार नाही. कोरोनामुळे मुलांना खूपच त्रास होत असल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय स्वीकारावा.
- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
परीक्षांसाठी काही कालावधी बाकी आहे. तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊन जाऊ शकते. तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहोचत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षेस अडचण येईल, असे वाटत नाही.
- एन. के. जरग, माजी माध्यमिक, शिक्षण संचालक