इंदापूरला अखेर धो-धो बरसला!
By admin | Published: September 7, 2015 04:20 AM2015-09-07T04:20:18+5:302015-09-07T04:20:18+5:30
अडीच महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यामुळे ये रे... ये रे... पावसा अशी विनवणी बळीराजा
पळसदेव : अडीच महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यामुळे ये रे... ये रे... पावसा अशी विनवणी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून करीत होता. अन् अचानक शनिवारी (दि. ५) रात्री निसर्गाच्या मनात आले अन् तो धो... धो... बरसला.
दीड तास पडत असलेल्या या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी पाणी करून टाकले. अन् बघता बघता बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. इंदापूरच्या पश्चिम भागाला शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. ओढे वाहू लागले, बंधारे भरले. शेतीमध्ये पाणी साचले.
पाऊस काही पडत नव्हता. पर्यायाने शेतातील पिके जळू लागली. जनावरे, वन्यप्राणी यांना चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली. तरीही पावसाचे आगमन होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत होता.
मात्र शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहात होता. अचानक गाराही पडत होत्या. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. वारा शांत झाला अन् पावसाचा वेग वाढला. भादलवाडी, डाळज, अकोले, पोंधवडी, कुंभारगाव या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ओढे वाहू लागले. बंधारे भरले. शेतातील सरींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पावसाने मुख्य पीक असलेल्या उसाला अधिक फायदा झाला आहे. जळू लागलेल्या पिकांना या पावसाने मोठा आधार मिळाला आहे. विजाही कडकडत होत्या. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. बिल्ट कंपनीजवळ वीजवाहक तारांवर झाड पडले. तसेच, चारचाकी वाहनांवरही झाडे कोसळली.
दडी मारल्यानंतर प्रथमच मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ऊस, कडवळ, मका, बाजरीच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. (वार्ताहर)