इंदापूर क्रीडा संकुलाची लागली ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:28 AM2018-11-15T01:28:27+5:302018-11-15T01:28:54+5:30

खेळाडूंचे भवितव्य धोक्यात : क्रीडाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष; क्रीडाशिक्षकांना सहीसाठी जावे लागते पुण्याला

Indapur Sports Complex Launches 'Wat' | इंदापूर क्रीडा संकुलाची लागली ‘वाट’

इंदापूर क्रीडा संकुलाची लागली ‘वाट’

googlenewsNext

सागर शिंदे

इंदापूर : ग्रामीण भागात चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, तसेच त्यांना शहराप्रमाणे चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने उभारण्यात आलेल्या ग्रामीण भागातील क्रीडा संकुलांची अवस्था बिकट झाली आहे. इंदापूर तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथे एकही सुविधा नसल्यामुळे व क्रीडाधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी एकही खेळाडू फिरकत नसल्याने शासनाच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे.

इंदापूर तालुका, तसेच परिसरातील गावांमधील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच तयारी करण्यासाठी सन २००४-०५ मध्ये हर्षवर्धन पाटील संसदीय कामकाजमंत्री असताना क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एकूण २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी इंदापूर तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी मिळाला. यातून या क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. इनडोअर हॉल, क्रीडाधिकारी कार्यालय व मैदान व कंपाऊंड भिंत बांधण्यात आले. मात्र, यानंतर या संकुलाकडे दुर्लक्ष झाले. येथे उभारण्यात आलेल्या अनेक क्रीडासाहित्याची देखभालीअभावी दुरवस्था झाल्याने खेळाडूंना अक्षरश: रस्त्यावर येऊन सराव करावा लागत आहे.

२०१४-१५ मध्ये १ कोटी रुपये विशेष बाबमधून इंदापूर क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले. मात्र, त्याचा प्रस्ताव २०१४ पूर्वीच मंजूर झाला होता. त्यानंतर आमदार भरणे यांनी त्याचा पाठपुरावा करून निधी आणला. मात्र त्यातील एकही रुपया आजतागायत मैदानावर खर्च झालेला दिसून येत नाही. क्रीडाधिकारी कार्यालयामागे स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमचे बांधकाम चालू आहे. मात्र, हे कामही ठेकेदाराने अर्धवट सोडून पळ काढल्याचे समजले.

या मैदानावर शांतता असल्याने दररोज सकाळी शहरातील डॉक्टर लोक इनडोअर हॉलमध्ये बॅडमिंटन खेळण्यासाठी येतात. त्या हॉलच्या चाव्यादेखील त्याच डॉक्टर लोकांकडे असल्याने, इतर खेळाडूंना त्याचा वापरही करता येत नाही. इंदापूर तालुक्याला तालुका क्रीडा अधिकारी हे निवासी पद आहे. मात्र, येथील क्रीडाधिकारी महिन्यातून केवळ एक ते दोन दिवस या ठिकाणी उपस्थित असतात. क्रीडा संकुलात खेळाडूंना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. येथे उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेले मैदानही खेळण्याजोगे तसेच सराव करण्यासारखे राहिले नाही. मागील तीन वर्षांत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी एकही वेळा या क्रीडा संकुलाच्या मैदानात पायही ठेवलेला नाही. या संकुलावर मागील दोन महिन्यांपूर्वी तालुकास्तरीय शालेय कबड्डी, खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये तालुक्यातील हजारो मुली व मुलांनी सहभाग घेतला होता. त्यातील काही खेळाडू मुरमाड मैदानामुळे गंभीर जखमी झाले तर काही पाण्याअभावी चक्कर येऊन पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील सागर मारकड, नाथा मारकड, सुलतान डांगे असे अनेक नामवंत खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर इंदापूरचा नावलौकिक पसरवला आहे.

तालुक्यातील अनेक मुले २०१४ पूर्वी याच संकुलावर मैदानी कसरती करण्यासाठी येत होते. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात इतर कोणत्याही ठिकाणी खेळण्यासाठी सुविधा नाही, कोणत्याही प्रकारचे मैदान नाही, त्यामुळे खेळाडू बारामती रोड, इंदापूर बाह्यवळण महामार्गाच्या डांबरी रस्त्यावरून दररोज धावताना दिसत आहेत. शारीरिक कसरती करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना गुडघे, कंबर व हाडांचे आजार
होत आहेत.

क्रीडाधिकाºयांच्या सहीसाठी जावे लागते पुण्यात
इंदापूर तालुक्यातील खेळाडूंना विभागीयस्तरावरील स्पर्धेसाठी नेत असताना, सोबत क्रीडाशिक्षक पाठवावा लागतो. त्यासाठी त्याला क्रीडाधिकारी यांच्या सहीचे पत्र व ओळखपत्र लागते. मात्र, इंदापूरचे निवासी क्रीडाशिक्षक इंदापूरमध्ये नसल्याने केवळ ओळखपत्रावर सही घेण्यासाठी क्रीडाशिक्षकांना स्वखर्चाने पुण्याला दोन-तीन चकरा माराव्या लागतात, असे एका क्रीडाशिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

२०१४-१५ मध्ये विशेष बाबमधून इंदापूर तालुका क्रीडा संकुलाच्या फुटबॉल मैदान, हॉकी मैदान, क्रिकेट मैदान व स्टेडियम दुरुस्तीसाठी मंजूर झाले असून, निधीही उपलब्ध झाला आहे. २०१६-१७ मध्ये मी इंदापूरला क्रीडाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यापासून कामे प्रगतिपथावर आहेत. येणाºया तीन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- सुहास व्होनमाने
इंदापूर तालुका
निवासी क्रीडाधिकारी

निधी २०१४-१५ चा,
मग त्या पैशांच्या व्याजासह
कामे करा
२०१४-१५ मध्ये क्रीडा संकुल नूतनीकरण करण्यासाठी निधी आला होता. मात्र, यांच्या अयोग्य नियोजन व कामातील कुचराईमुळे निधी तीन वर्षे तसाच पडून आहे. त्या पैशांच्या मिळणाºया व्याजासह सध्या मैदानावर काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे खेळाडूंचा फायदा होणार आहे, अशी पालकवर्गातून मागणी करण्यात आली आहे.
 

Web Title: Indapur Sports Complex Launches 'Wat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.