इंदापूर : इंदापूर तालुका शांत विचाराने एकत्रितपणे समाजकारण करणारा तालुका आहे. छप्पन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो. माझ्या आधी दहा वर्षांपूर्वी १९५२ सालापासून शंकरराव पाटील इंदापूरमधून निवडून येत होते. सत्ता कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही, ही गोष्ट इंदापूरने शिकवली. शंकरराव पाटील यांनी राजकारण केले. ते कधी हवेत राहिले नाहीत. सत्ता कधी डोक्यात गेली नाही. नम्रता कधी सोडली नाही. स्वच्छ कारभार कधी सोडला नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या सर्वांना त्यांचे स्मरण होत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपूर्वी भाजपचा राज्यमंत्री असणाऱ्या खासदाराने आम्हाला घटना बदलायची आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या मागे बहुमत उभा करावे, असे आवाहन मतदारांना केले होते. लोकशाहीत सत्ता मिळणे, ती लोकांसाठी वापरणे, त्याच्यामध्ये काही गैर नाही. देशाच्या पंतप्रधानांना लोकांसाठी राज्य करायला त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्यावे, असे म्हणणे आपण समजू शकतो. मात्र सत्तेचा वापर करून ज्या घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मूलभूत अधिकार दिले. ती बदलण्याचा घाट घातला जातो आहे. तुमच्या अधिकारावर हल्ला होण्याची शक्यता हा खरा देशापुढचा धोका आहे. तो टाळण्यासाठी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकार सत्तेचा व दडपशाहीचा वापर करत आहे. खा. संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, झारखंडचे मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी यांचे मंत्री, आपचे मंत्री व आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले, असल्याचेही त्यांनी सांगितले.
चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना बाजूला करा
ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. एका बाजूने महागाई, दुसऱ्या बाजूने बेकारी, तिसऱ्या बाजूने भ्रष्टाचार आहे. हे घालवायचे असेल तर, चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणे हे तुमचे माझे कर्तव्य आहे. केंद्रीय कृषीमंत्री असताना, कांद्याचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आलेल्या भाजपवाल्यांना तुम्ही कांद्याच्याच काय पण, कवड्यांच्या माळा जरी घालून आलात तरी कांद्याचे दर कमी केले जाणार नाहीत, असे आपण सांगितले होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.