ब्राझील महोत्सवात इंदापूरचा लघुपट; देशातील विविध महोत्सवांत नोंदवला सहभाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:26 PM2017-12-09T13:26:01+5:302017-12-09T13:30:21+5:30

सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. 

Indapur's short film at the Brazil Festival, Participated in various festivals in india | ब्राझील महोत्सवात इंदापूरचा लघुपट; देशातील विविध महोत्सवांत नोंदवला सहभाग 

ब्राझील महोत्सवात इंदापूरचा लघुपट; देशातील विविध महोत्सवांत नोंदवला सहभाग 

Next
ठळक मुद्देनीरा नदीकाठी वसलेल्या नीरा नरसिंगपूर येथे ६ दिवसांच्या कालावधीत लघुपटाचे चित्रीकरण पूर्णहरवण्याच्या मार्गावर असलेल्या माणुसकीच्या नात्यावर टाकण्यात आला प्रकाश

दीपक कुलकर्णी । 
पुणे : चित्रपट या माध्यमाला काळ, प्रांत, भाषा आणि जात यांच्या मर्यादेची चौकट लागू होत नाही. त्यात चित्रपट असो वा लघुपट. या प्रकारात निर्माण होणाऱ्या कलाकृती रुपये आणि प्रसिद्धी यांच्यापेक्षा आशयसंपन्नतेने महत्त्वाच्या ठरतात. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अफलातून जमलेल्या भट्टीमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अशीच एक कलाकृती म्हणजे सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. 
द गोल्ड पिरॅमिड पिक्चर्स आणि ग्रीन वूड क्रिएशन यांची निर्मिती असलेल्या इंदापूरच्या सोमनाथ जगतापने इंदापूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी लघुपटाची कथा लिहीत असतानाच आपली कलाकृती परदेशी पाठविण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी इंदापूर ते मुंबई अशी कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम टीमची सांगड घातली. नवख्या व काही अनुभवी कलाकारांना सोबत नीरा नदीच्या काठावर वसलेल्या नीरा नरसिंगपूर येथे सहा दिवसांच्या कालावधीत लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.  
या लघुपटाने पुणे, नाशिक, आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात सहभाग नोंदविला. पुढे या कलाकृतीला परदेशी पाठविण्यासाठी संपूर्ण टीमची धडपड सुरु होती. पुढच्या प्रवासाबद्दल सर्व टीमच्या मनात प्रश्नचिन्ह होते. या सोशल मीडियाचा पर्याय त्यांच्या मदतीला धावून आला. या पर्यायाने त्यांना सात ते आठ असे विविध देशांतील लघुपट महोत्सवाचे दालन खुले करून दिले. यामध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी २ ग्रीन अर्थ फिल्म फेस्टिव्हल’च्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यापर्यंत या लघुपटाने यश मिळविले.
एक महिन्याच्या कालावधीतच पुन्हा एकदा हा लघुपट ब्राझील येथे होणाऱ्या इको फेस्टिव्हलसाठी निवडण्यात आला. वीस मिनिटांच्या या लघुपटात शहर व ग्रामीण भागात हरवण्याच्या मार्गावर असलेल्या माणुसकीच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षासुद्धा कधी कधी अनोळखी नाते आयु्ष्यात गरजेच्या वेळेला उपयोगात येतात. प्रेमाच्या पलीकडचे विलक्षण नातं या लघुपटात दिग्दर्शक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या लघुपटात यश वरेकर, शिवानी शिंदे, मिलिंद शिळीमकर, स्वप्नील कुलकर्णी, सौरभ जाधव, आकाश करे आदींनी भूमिका साकारल्या आहे. या लघुपटाचे संगीत मुंबईच्या मंदार पाटील यांनी दिले आहे. छायांकन पिनू जगताप आणि ओंकार मारणे तर वेशभूषा छाया शिंदे यांची आहे.

ब्राझीलपर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. परंतु या प्रवासाने खूप काही गोष्टी शिकविल्या. तसेच प्रेरणाही दिली. ग्रामीण पातळीपासून जपलेली चित्रपट या क्षेत्राची आवड मनाला समाधानकारक आहे. पण या कामासाठी संपूर्ण टीमने घेतलेल्या अतोनात मेहनतीमुळेच यश मिळाले आहे. या लघुपटासाठी महेश कोकाटे, डॉ. अमित कांबळे, सुशील महाजन, रेश्मा शिंदे आदींचे खूप सहकार्य लाभले. 
- सोमनाथ जगताप, दिग्दर्शक
 

Web Title: Indapur's short film at the Brazil Festival, Participated in various festivals in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.