अनधिकृत खाणीवर वॉच ठेवण्यासाठी विकसित करणार स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:06 PM2017-12-01T16:06:46+5:302017-12-01T16:09:31+5:30
जिल्ह्यातील अनधिकृत खाणी व बेसुमार उत्खनन यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्यात येणार आहे.
पुणे : शासनाकडून उत्खननाची परवानगी मिळाल्यावर सर्व नियम धाब्यावर बसवत खाण मालकांकडून सर्रसा बेसुमारपणे उत्खनन केले जात आहे. यामुळे पर्यावरणाची प्रचंड मोठी हानी होत असून, शासनाचा दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. जिल्ह्यातील अनधिकृत खाणी व बेसुमार उत्खनन यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या सिस्टिममुळे शासनाच्या महसूलामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक नुकतीच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सैरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात बांधित क्षेत्रातील गावांमधील विकास कामे व अनधिकृत खाणी व बेसूमार उत्खनन यावर नियंत्रण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक असलेला निधी प्रतिष्ठानमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’च्या माध्यमातून सेटलाईट इमेजद्वारे जिल्ह्यातील खाण पट्टयांवर वॉच ठेवणार आहे. ‘कार्टो साईट’ उपग्रहाचा देखील यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या सस्टिसमद्वारे जिल्ह्यात किती खाण पट्ट्यांना परवानगी दिली, ‘खसार मॅप’, किती खाणी सध्या सुरु आहेत, अनधिकृत खाणींची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ‘सेटलाईट इमेजद्वारे’ या सर्व खाण पट्ट्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. परवानगी पेक्षा अधिक उत्खनन केले, परवानगी न घेता एखाद्या ठिकाणी खाण सुरु करण्यात आली याची माहिती प्रशासनाला सहज व कार्यालयात बसून सेटलाईट इमेजद्वारे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.