भारताने स्वत:चा आवाज तयार करायला हवा- पररराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर
By भाग्यश्री गिलडा | Published: November 25, 2023 05:12 PM2023-11-25T17:12:54+5:302023-11-25T17:18:09+5:30
आपली संस्कृती आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पहायला हवे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले...
पुणे : पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने "आंतरराष्ट्रीय संबंध" परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या धोरणात्मक संस्कृती- जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांना संबोधित केले. भारताने स्वत:चा आवाज तयार करायला हवा. त्यासाठी आपली संस्कृती आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पहायला हवे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
स्वातंत्र्यानंतर जपान, चीन आणि भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचे कल्चर कॉपी केले आहे. परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरवणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यकर्त्यालाही आपले ध्येय साध्य करण्यासाठी, नियंत्रणाबाहेर असलेले अनेक घटक, वरचेवर घडणाऱ्या अकल्पित घटना लक्षात घेऊन आपल्या धोरणाची दिशा आणि डावपेच ठरवावे लागतात. अर्थात परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात. परराष्ट्रीय धोरणाचे सत्तासमतोल हे सुद्धा पारंपरिक साधन मानले जाते. त्याचे अनेक अर्थ असले, तरी साधारणपणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोणताही एक देश अतिबलशाली होऊ नये, यासाठी केलेली राष्ट्रांची युती अथवा केलेले करार, असा याचा अर्थरूढ आहे. सतराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत इंग्लंडने युरोपातील राष्ट्रांमध्ये समतोल राखण्याची भूमिका बजाविली होती. असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केले.
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी परराष्ट्र धोरणासाठी सांस्कृतीक देवाणघेवान महत्त्वाची असल्याचे नमूद केले. पुण्याची सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सिंबायोसिसची पाया देशाच्या सांस्कृतिक परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे योगदान देत आहे. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण आणि डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.