पुणे : पाकिस्तानात अल्पसंख्यांक म्हणून हिणवले जायचे...भारतात आल्यावर पाकिस्तानी म्हणून वेगळ्या भावनेने पाहिले जात होते, अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानातील सिंधी व्यक्तींना अनेक वर्षांच्या झगड्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या २२ सिंधी व्यक्तींना मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले. शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही पाचशेच्यावर पाकिस्तानि निर्वासित नागरिकत्वाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सिंधी समाजाकील धर्मगुरु संत युधिष्ठीर लालजी, हेमंत निकम, नागपूरचे वीरेंद्र कुकरेजा, डब्बू आसवानी, बाळासाहेब रुणवाल आणि सिंधी समाजातील व्यक्ती होत्या. डॉ. कटारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ‘भारत माता की जय’ असा घोष करताना दिसत होती. या पुढे भारतीय नागरिकांप्रमाणे मतदानाचा आणि मालमत्ता खरेदी करण्याचा देखील अधिकार त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकत्व न मिळालेल्या तीनशे जणांचा मेळावा पिपंरी येथे झाला असून, अजूनही पाचशेवर व्यक्ती नागरिकत्वासाठी झटत आहेत. याबाबत माहिती देताना डॉ. कटारे म्हणाल्या, या पुर्वी नागरिकत्व देण्याचा अधिकार सरकारला होता. मात्र, २०१६मधे त्यात सुधारणा करुन जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले. जानेवारी-फेब्रुवारी २०१९मधे ५० जणांना नागरिकत्व देण्यात आले. अजूनही तीनशेच्यावर व्यक्तींच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे. नजीकच्या काळात पन्नास ते शंभर व्यक्तींना नागरिकत्व दिले जाईल. परदेशी व्यक्ती नोंदणी कार्यालय (एफआरओ) आणि गुप्तचर विभगाकडून प्रक्रिया जलद होत असल्याने, नागरिकत्व मिळण्याचा कालावधी कमी झाला आहे. संत युधिष्ठीर म्हणाले, पाकिस्तानातून आलेले असले तरी ते मूळचे इथलेच रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्याकडे पाकिस्तानी असल्याच्या नजरेतून पाहिले जात होते. आता त्यांना इतर नागरिकांप्रमाणे मतदान आणि मालमत्तेचे सर्व अधिकार प्राप्त होतील. ------------------१८ जून सिंधी नागरीक : पाकिस्तानातून स्थलांतरीत झाललेल्या दहा ते तीस वर्षांहून अधिककाळ वास्तव्यास असलेल्या सिंधी व्यक्तींना मंगळवारी भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.------------------पाकिस्तानात असताना आम्हाला अल्पसंख्यांक म्हणून खूप त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे २००८ साली आई, वडील आणि बहीण असे कुटुंबिय पुण्यात आलो. येथे सुका मेव्याच्या विक्रीचा व्यवसाय सुरु केला. नागरिकत्व नसल्याने मालमत्ता खरेदी करता येत नाही. त्यामुळे भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. येथेही, परदेशी नागरिकाप्रमाणे वागविले जात होते. नागरिकत्व मिळविण्यासाठी अनेकदा दिल्लीला खेटे मारावे लागले. त्यानंतरही नागरिकत्व मिळाले नाही. आता, माझी बहिण अंजली आस्वानी हीला नागरिकत्व मिळाले असून, माझा प्रस्ताव देखील लवकरच मार्गी लागेल. विशाल कालरा, स्थलांतरीत
पाकिस्तानी सिंधींना मिळाले भारतीय नागरिकत्व : प्रमाणपत्राचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:05 PM
गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या २२ सिंधी व्यक्तींना मंगळवारी भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले
ठळक मुद्देअजूनही पाचशे व्यक्ती नागरिकत्वाच्या प्रतिक्षेतपरदेशी व्यक्ती नोंदणी कार्यालय (एफआरओ) आणि गुप्तचर विभगाकडून प्रक्रिया जलद पाकिस्तानात असताना आम्हाला अल्पसंख्यांक म्हणून खूप त्रासाला सामोरे जावे लागले