कुरुळी : इंद्रायणीनदीला जलपर्णीने विळखा घातला असून, यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. हे दूषित पाणी नदीलगतच्या गावांना प्यावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन फक्त कागदावर जलपर्णी काढण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.इंद्रायणी नदी वारकऱ्यांचे श्रद्धास्थानआहे. ही नदी खेड-हवेली तालुक्याची जीवनदायी म्हणून ओळखली जात होती. मात्र हीच जीवनदायी सध्या गटारगंगा झाली आहे. यास पिंपरी पालिका प्रशासन व रहिवासी जबाबदार आहेत. नदीपात्रात जलपर्णी साचल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. दुर्गंधीमुळे नदीमधील जलचर व काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नदीसुधार प्रकल्प राबविण्यासाठी पालिका प्रशासन वेळोवेळी बोलते. मात्र, यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. नदीपात्र स्वच्छ व सुंदर असावे अशी कल्पना या भागातील लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी वेळोवेळी बोलतात. मात्र, याबाबत अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. श्रीक्षेत्र देहूपासून आळंदी देवाचीपर्यंत नदीपात्रात ठिकठिकाणी गटारे तसेच काही कंपन्यांचे दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील सांडपाणी, मैलामिश्रित रासायनिक पाणी थेट नदीपात्रात येऊन मिसळते. यामधे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
जलपर्णीमुळे इंद्रायणी प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 2:22 AM