सुपे : बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथे मागील पंधरा दिवसांपासून चिकुनगुणिया सदृश आजाराची लागण झाली आहे. हा आजार त्वरित नियंत्रणात न आल्यास साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.
मागील पंधरा दिवसांपासून येथे सांधेदुखी, हाता-पायांचे गोळे दुखणे, गुडघे दुखणे, डोकेदुखी, ताप येणे, आदी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहे. येथील रुग्ण सुपे, लोणीभापकर आणि मोरगाव आदी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या घेतल्या असता डेंग्यू, चिकुनगुणिया आढळून आला नाही. मात्र, चिकुनगुणिया सदृश आजार असल्याची माहिती डॉ. संजय उपाध्ये यांनी दिली. यामध्ये काही रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र, जेवढे बरे होण्याचे प्रमाण आहे, तेवढेच रुग्ण वाढण्याचे प्रमाण असल्याने साथ वाढण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना राबवून येथील आजार आटोक्यात आणण्याची गरज आहे. तसेच येथे कोरोनाचे रुग्ण आहेत. ते वाढू नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना राबवली पाहिजे. चिकुनगुणिया सदृश आजारामुळे ग्रामपंचायतीने गावात डास प्रतिबंधात्मक धुरळणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात येथील सरपंच माऊली पोमणे यांच्या संपर्क केला असता ते म्हणाले की, रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यासाठी गावात दोन दिवसांत डास प्रतिबंधक धुरळणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, येत्या दोन दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने बाबुर्डीत सर्वेक्षण करण्यात येईल. तर नागरिकांनी घाबरून न जाता घराभोवतालील परिसर स्वच्छ ठेवणे, डास उत्पती स्थानके नष्ट करणे तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच काही लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.