पुणे : माहिती केंद्रासाठी जागेच्या शोधात असलेल्या महामेट्रोला अखेर महापालिकेने छत्रपती संभाजी उद्यानात जागा दिली आहे. १५ आॅगस्टला हे माहिती केंद्र सुरू होईल. मेट्रोच्या बोगीची हुबेहूब प्रतिकृती असलेल्या या केंद्रात पुणे मेट्रोसंबंधीची सर्व माहिती संगणकाद्वारे देण्यात येणार आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. महामेट्रोच्या वतीने गेल्या वर्षभरापासून माहिती केंद्र सुरू करण्यासाठी जागेचा शोध घेण्यात येत होता. उद्यानांमध्ये पक्के बांधकाम करायला परवानगी नसल्यामुळे छत्रपती संभाजी उद्यानातील जागा देण्यास महापालिका प्रशासन नकार देत होते. शहराबाहेरच्या काही जागा महापालिकेने देऊ केल्या; मात्र तिथे लोकसंपर्क कमी असल्यामुळे महामेट्रोला त्या पसंत पडत नव्हत्या. त्यामुळे माहिती केंद्रांचे काम लांबणीवर पडत होते. अखेरीस आता उद्यानाच्या मागे, नांदे तलावापासून थोडे पुढच्या बाजूला महापालिकेने जागा देऊ केली आहे. तिथे हे केंद्र सुरू होईल.मेट्रोबाबत पुणेकरांच्या मनात अनेक शंका आहेत. भुयारी मार्ग कोठून जाणार, कसा जाणार, त्याची लांबी किती असेल, मेट्रोची स्थानके कशी असतील अशा प्रकारची मेट्रोसंबंधीची सर्व माहिती या केंद्रातून मिळेल. संपूर्ण बोगी वातानुकूलित असेल. तीन मोठे पडदे तिथे लावलेले असतील. त्यावर मेट्रोच्या कामाबाबतच्या चित्रफिती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. त्याशिवाय मेट्रोचे काही अधिकारी केंद्रात कायम उपस्थित असतील. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतील.स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे तसेच शाळा, महाविद्यालयांसाठी हे केंद्र कार्यालयीन वेळेत खुले असेल. त्याचे बांधकाम पक्के नाही. कायमस्वरूपीही नाही. मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाला की हे केंद्र बंद करण्यात येईल. मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत ते सुरू असेल. नागरिकांनी आपल्या शंका लिहून तिथे दिल्या तरी मेट्रोच्या वतीने त्यांना उत्तर दिले जाईल. पुणे शहरासाठी मेट्रो हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यासंबधी नागरिकांच्या मनात कसल्याही शंका राहू नयेत यासाठी केंद्र सुरू करत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.मेट्रो असणार तरी कशी याबाबत नागरिकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. ती या केंद्रांच्या माध्यमातून पूर्ण होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. हे केंद्र म्हणजे आतील आसनांसह मेट्रोच्या डब्याची प्रतिकृती असेल, असे ते म्हणाले.
माहिती केंद्र स्वातंत्र्यदिनी सुरू होणार, मेट्रोच्या बोगीची हुबेहूब प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:55 AM