पुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:28 PM2018-04-16T15:28:30+5:302018-04-16T15:28:30+5:30
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमच अधिराज्य करत होते आणि कायमच राहतील. त्यांची आठवण म्हणून पुण्यात एक वेगळ्या शिल्पाची उभारणी वेगाने सुरु आहे.
पुणे : भगवे कपडे, डोळ्यावर काळा चष्मा, दाढीची विशिष्ट ठेवणं आणि हातात रुद्राक्षाची माळ हे वर्णन कोणाचे आहे हे महाराष्ट्रात तरी सांगायची गरज नाही. हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांची मूर्ती डोळ्यासमोरून जाते अशक्यच आहे. त्यांची स्मृती म्हणून अनेक रस्त्यांना, उपक्रमांना त्यांचे नाव देण्यात आले. इतकेच काय तर त्यांच्या नावाने रुग्णालयेही काढण्यात आली. मात्र त्यांची स्मृती जपून ठेवण्याचा वेगळा प्रयत्न पुणे महापालिकेचे शिवसेना गटनेते संजय भोसले करत आहेत. ठाकरे यांचा आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेल्या हाताचे शिल्प येरवड्यातील पर्णकुटी चौकात भोसले साकारत असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. आजूबाजूला जाणारे येणारे या वेगळ्या शिल्पाला थांबून न्याहाळत असल्याचे चित्र पर्णकुटी चौकात बघायला मिळत आहे. ठाकरे यांच्या हातात असलेली रुद्राक्षाची माळ आणि भगवे कपडे घातलेली बाही स्पष्ट दिसत आहे. या शिल्पाचे काम सध्या अपूर्ण असून येत्या काळात हे शिल्प सजावटीसह खुले होणार आहे. महापालिकेच्या सजावटीच्या अंतर्गत या कामाची निविदा काढण्यात आली असून त्याला साधारण दोन लाख रुपये एवढा खर्च होणार आहे. याबाबत भोसले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, शिवसैनिकांच्या बाळासाहेबांच्या हाताशी विशेष आठवणी निगडीत आहेत. आम्ही जेव्हा मातोश्रीवर जात असून तेव्हा खिडकीतून साहेबांचा आशीर्वादाचा हात आम्हाला बळ देत असे. त्यामुळे याच हाताचे शिल्प उभारण्याचे मी ठरवले.येत्या काही काळात हे शिल्प पूर्ण होणार असून लवकरच ते पुणेकरांसाठी खुले होईल.