पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान उडालेल्या गोंधळाची, तसेच विद्यार्थ्यांनी कॅापी करण्यासाठी लढवलेल्या युक्त्यांची माहिती देत विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांचे वाभाडे काढले. त्याचप्रमाणे चांगल्या वातावरणात ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसेल, तर केवळ ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा घ्यावी, असा आग्रह धरला.
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. परीक्षा विभागाने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेवर अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना आलेल्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाची यंत्रणा अपुरी पडली. तसेच विद्यार्थी उद्यानामध्ये एकत्र येऊन ग्रुप करून परीक्षा देत असल्याचे दिसून आल्याची माहिती अधिसभा सदस्यांनी दिली. परीक्षेसाठी विचारलेले प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे व हास्यास्पद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
विद्यापीठाने परीक्षेसाठी निवडलेल्या एजन्सीच्या क्षमतेवर यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत विद्यापीठाकडे तक्रारी केल्या. विद्यापीठाकडून अनेक विद्यार्थ्यांचा चुकीचा निकाल जाहीर केला. ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक गुण मिळाले. ऑनलाईन परीक्षेत होत असलेल्या गोंधळामुळे विद्यापीठाच्या नावलौकिकाला धक्का पोहचत आहे. त्यामुळे या पुढील काळात विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा घावी. ऑनलाईन परीक्षा केवळ प्रॉक्टर्ड पध्दतीने घ्यावी, अशी भूमिका अधिसभा सदस्य गिरीश भवळकर, संतोष ढोरे,दादाभाऊ शिनलकर आदींनी मांडली. त्यावर विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर,परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक महेश काकडे यांनी विद्यापीठातर्फे अधिक चांगल्या पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.