इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूगर्भात खनिज तेलाचे साठे तपासण्याची काम सुरू झाले आहे. गाळयुक्त खो-यात हे साठे असण्याच्या शक्येतवरून हे काम सुरू झाले आहे.याला इंदापूरच्या तहसीलदारांनीही दुजोरा दिला आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम एवं प्राकृतिक गॅस मंत्रालयामार्फत देशातील गाळयुक्त खो-यात खनिजतेलाचे साठे असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनी २ डी सेस्मिक डेटा संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने ३0 जून २0१६ रोजी तसा अध्यादेश काढला असून, सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना या उपक्रमाला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.याबाबत इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला शासनाचे याबाबत पत्र आले असून, ही यंत्रणा तालुक्यात दाखल झाली आहे. सध्या आम्ही याची तपासणी करून घेत असल्याचे सांगितले.असे चालते शोधकार्य...सॅटेलाईटचा उपयोग करून राज्यामध्ये सर्व्हे करण्याची स्थाने अक्षांश व रेखांशच्या मदतीने निश्चित करण्यात आलेली आहेत. ही ठिकाणे जीपीएसच्या मशीनने शोधून त्या ठिकाणी साडेचार इंचाचे बोअरवेल घेतले जाते. त्यामध्ये पाणी भरून एक छोटासा ब्लास्ट केला जातो. त्यामुळे येणाºया लहरी एका मशीनमध्ये संकलित केल्या जातात. त्यावरून या ठिकाणी किती प्रमाणात गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत हे समजणार आहे.डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्यानुसार इंदापूर तालुक्यातील बावडा, शेटफळ हवेली, राजवडी, अगोती, वकीलवस्ती, वडापुरी, तरंगवाडी, वनगळी, करेवाडी ही गाळयुक्त गावे असून येथे खनिज तेलाचे साठे असण्याची शक्यता आहे. त्यानुसार या गावांतील वाड्यावस्त्यांवरील जमिनीत बोअर घेऊन चाचण्या घेण्याचे काम चालू आहे. यासाठी दहा बोअर घेणाºया मशीन व ट्रॅक्टरच्या वाहनांचा ताफा काम करीत आहे.
इंदापूर तालुक्यात खनिजतेल साठ्यांची तपासणी, गाळयुक्त खो-यात साठे असण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:11 AM