प्रेमनगर वसाहतीच्या कचरा समस्येची पाहणी - सहायक आयुक्त, बाजार समिती सचिवांनी उपाययोजना करण्याचे दिले आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:35+5:302021-03-16T04:10:35+5:30
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आंबेडकरनगर, प्रेमनगर, आनंदनगर वसाहती येतात. यामधील ड्रेनेज लाईन दुरुस्ती व कचरा समस्यांची पाहणी सहायक ...
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आंबेडकरनगर, प्रेमनगर, आनंदनगर वसाहती येतात. यामधील ड्रेनेज लाईन दुरुस्ती व कचरा समस्यांची पाहणी सहायक आयुक्त आणि बाजार समितीचे सचिवांनी केली. त्यांनी त्वरित योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, या घनदाट लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये उंदीर व घुशी यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वसाहतींमधील ड्रेनेज लाईनचे जाळे भुसभुशीत झाले आहे. ड्रेनेजलाईनमध्ये माती अडकल्याने ते तुंबले जाते. परिणामी घाण पाणी अनेक ठिकाणाहून रस्त्यावर येते. तेथे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
या वसाहतीमधील पिण्याच्या पाण्याची लाईन व ड्रेनेज लाईनचे योग्य नियोजन करावे. तसेच या वसाहतींच्या आजूबाजूस प्रचंड कचरा साठला आहे. त्यातून दुर्गंधी येते. या सर्व समस्यांच्या बाबतीत नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गणेश सोनवणे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गणेश सोनवणे व बाजार समितीचे सचिव सतीश कोंडे व कर्मचारी यांनी कचऱ्याची पाहणी केली.
संपूर्ण कचरा उचलण्याची चर्चा झाली, त्यावर लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती व महापालिका निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर लोकांमधे जनजागृती करावी, ओला सुका कचरा विलगीकरण, तसेच स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना कचरा द्यावा, अशा सूचना केल्या.
................................................................................
फोटो ओळ:- बिबवेवाडी येथील प्रेमनगर वसाहत व आंबेडकरनगर वसाहत येथे विविध समस्यांच्या प्रश्नावर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त यांनी पाहणी केली.