राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जाण्याऐवजी मुख्यमंत्री माधुरी दीक्षितकडे गेले- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 06:54 PM2018-06-10T18:54:33+5:302018-06-10T18:54:33+5:30
सत्तेची गुर्मी दाखवू नका, विरोधी पक्ष नेहमीच सत्तेपासून दूर राहत नाही हे लक्षात ठेवा, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे.
पुणे : सत्तेची गुर्मी दाखवू नका, विरोधी पक्ष नेहमीच सत्तेपासून दूर राहत नाही हे लक्षात ठेवा, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. 6 जूनला शिवराज्याभिषेक राज्यात साजरा होत असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री त्यांच्या सरकारने 4 वर्षांत केलेल्या कामगिरीचे कौतुक करणारे पुस्तक घेऊन माधुरी दीक्षितकडे गेले. परंतु छत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाला भाजपाचे कावळे माधुरी दीक्षितकडे गेल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या 19व्या वर्धापन दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप सभेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, आज राष्ट्रवादीची सभा आहे म्हणून नेटवर्क बंद करण्यात आले आहे. भाजपा रडीचा डाव खेळत आहे. भाजपच्या पराभवासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. सध्या समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. आतापर्यंत पंतप्रधान परदेशात जायचे आता मुख्यमंत्री परदेशात गेले आहेत.
भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार होत आहेत. कोणावरही वचक राहिलेला नाही. भुजबळ यांच्यावर नुसते आरोप झाले म्हणून त्यांना 26 महिने तुरुंगात टाकलं, कायदा हे सांगत नाही. राज्यात 1400 शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. राज्याभिषेकदिनी रायगडावर जाण्याऐवजी मुख्यमंत्री माधुरीला भेटायला गेले. राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी संपावर जातायेत. या पुढे राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल. सर्व महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करू, असंही अजित पवार म्हणाले आहेत.