आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व अबाधित : डॉ. अस्मिता वेले; ‘केशायुर्वेद’तर्फे पुण्यात परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:44 PM2018-01-08T12:44:41+5:302018-01-08T12:48:15+5:30
संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत’’, असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात केले.
पुणे : ‘‘युरोपीय देशांसहित जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहात आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडे योग आणि आयुर्वेद निर्यात करण्यासारख्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत’’, असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी केले.
केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ. वेले बोलत होत्या. या वेळी मंदार जोगळेकर, डॉ. हरीश पाटणकर, डॉ. दत्ताजी गायकवाड, डॉ. अजित कोल्हटकर, डॉ. सुकुमार देशमुख, अस्मा इनामदार, प्रियांका चोरगे उपस्थित होते. डॉ. सुकुमार देशमुख, डॉ. अस्मा इनामदार, डॉ. प्रियांका चोरगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
डॉ. वेले म्हणाल्या, ‘‘वैद्यांनी प्रत्येक गोष्टीचा दस्तावेज ठेवला पाहिजे. आयुर्वेद सर्व देशांपर्यंत पोहोचू लागले आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालयही त्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक देशात आयुषमार्फत भारतीय दूतावासात आयुर्वेदाचे अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यामुळे परदेशात नव्याने आयुर्वेदात काम करू पाहणाऱ्यांना संधी आहेत. त्याचा फायदा भारतीय वैद्यांनी घेऊन आपल्या आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला पाहिजे.’’
डॉ. भावना उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. दत्ताजी गायकवाड यांनी आभार मानले.