पुणे : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या असाधारण स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या आपत्ती निवारण कक्षात आलेल्या फोनवरून नागरिकांना, आम्ही आहोत घाबरू नका असा दिलासा देत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या आपत्ती निवारण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ०२०-२४४७२८५० असा आहे. पुणे शहर तहसीलदार, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजनेचे प्रमुख, नगर भूमापन अधिकारी यांनी तिथे ड्युटी ठरवून घेतली असून कक्ष २४ तास सुरू ठेवला आहे. अन्य काही कर्मचारी व पोलिस तिथे नियुक्त करण्यात आले आहेत.
नायब तहसीलदार संजय मधाळे म्हणाले, कक्षातील फोन सतत खणखणत आहेत. नागरिकांच्या धान्य मिळत नाही, दुकान खुले करून द्या थोडा वेळ, चढ्या भावात भाजीपाला विकला जात आहे अशा तक्रारी येतात. त्याचे तिथे प्रत्यक्ष कर्मचारी पाठवून निराकरण करत आहोत. कक्षाच्या वतीने मजूर अड्डा, काही वस्त्यांमध्ये कोरडा शिधा ऊपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कक्षाकडून नागरिकांना सातत्याने घाबरु नका, सरकारी सुचनांचे पालन करा, घराबाहेर फिरू नका असे आवाहन करण्यात येत आहे. प्रामुख्याने कष्टकरी वगार्चे पोट भरण्याचे मार्ग खुंटले आहेत. ती अडचण सोडवण्यासाठी वस्त्यांची यादी करून तिथे रेशनवरचा कोरडा शिधा पोहचवता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात असे कक्ष स्थापन केले असून ते २४ तास सुरू ठेवण्यात आले आहेत अशी माहिती कक्षातून देण्यात आली.