पुणे : काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये, विशेषत:, काश्मीर खो-यामध्ये पडसाद उमटले. कलम रद्द करताना अथवा तत्सम कोणताही निर्णय घेताना काश्मीरमधील स्थानिल लोकांना विश्वासात घेतले पाहिजे, ही भूमिका सरहद संस्थेने सुरुवातीपासून घेतली होती. आजारी माणसाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते. त्याच्या शरीराचा कमकुवत झालेला भाग सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात, दूध-फळे दिली जातात. त्याचप्रमाणे, ३७० कलम रद्द झाल्यानंतर तेथील नागरिकांची काळजी घेणे हे सरकारचे आणि देशवासियांचे कर्तव्य आहे असे मत संजय नहार यांनी व्यक्त केले.
भारत हा आपला देश आहे आणि आपण या देशाचे नागरिक असल्याचा काश्मीरमधील लोकांना अभिमान वाटावा, अशा प्रकारची कृती आणि कार्यवाही सरकारकडून अपेक्षित आहे. त्या दिशेने जाणे अत्यावश्यक आहे. मात्र, सरकार यामध्ये कमी पडत आहे. स्थानिक माणसांचा सन्मान करणे, त्यांना रोजगार मिळवून देणे, ऐतिहासिक वारसा जपणे आणि कणखर नेतृत्व देणे यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. काश्मीरमधील जमिनी बळकवल्या जातील, अशी भीती तेथे उत्पन्न झाली आहे. यातून बाहेर पडून काश्मीरमधील लोकांचा विकास केंद्रस्थानी असला पाहिजे.सरहद संस्थेतर्फे काश्मीरमधील शेतक-यांना बाजारपेठ मिळवून देणे, कलावंतांना, कारागिरांना व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे अशा स्वरुपाचे प्रयत्न केले जात आहेत. आमच्या प्रयत्नांची व्याप्ती मर्यादित आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न व्यापकतेने झाल्यास काश्मीरमधील सामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. काश्मीरमधील विकासासाठी एखादा प्रयत्न अथवा उपक्रम न राबवता, त्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत. हा देश आपला नाही, अशी भावना त्यांच्या मनात चुकूनही निर्माण होता कामा नये.३७० कलम रद्द होऊन चार-पाच महिने उलटल्यानंतरही काश्मीरमधील स्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. अजूनही बाजारपेठा पूर्णपणे सुरु झालेल्या नाहीत, पर्यटन व्यवसायात मंदी आहे, अनेकांचे रोजगार गेले आहेत. काश्मीरमधील लोकांना जगण्याचा संघर्ष सुरु आहे. तरुण नव्याने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. दहशतवादी कारवाया घडण्याची, लष्करापुढील आव्हाने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेऊन, विकासावर भर देऊन सातत्याने प्रयत्न करत रहावे लागणार आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तरुणांना सुरक्षित वातावरण मिळावे, व्यासपीठ मिळावे, यासाठी काम करणे गरजेचे आहे.