पुुणे : पाच राज्यांतील निवडणूकांचा प्रचार करून वेळ मिळाल्यावर आता नरेंद्र मोदी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पुण्यात येत आहेत. मेट्रोचे काम अर्धवट झालेले असताना पंतप्रधानांना बोलवून शहर भाजपा त्यांची दिशाभूल करून पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत गेली.जगताप म्हणाले, एकीकडे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून अर्धवट विकासकामांच्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्यांचा निषेध काळे झेंडे न दाखवता मूक आंदोलनाने करण्यात येणार आहे.' राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधानांच्या निषेधार्थ काही व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत. पालकमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित राहणार असले तरी राष्ट्रवादीतर्फे मूक आंदोलन केले जाणार आहे.'मेट्रोचे ३१ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान उदघाटनासाठी आले असते, तर आम्हाला आनंदच झाला असता. ५ किमीच्या मार्गाच्या उदघाटनासाठी येणे म्हणजे शहरातील फुलराणीच्या उदघाटनसाठी येण्यासारखे आहे आणि हे पहावे लागणे हे आपले दुर्दैव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजपचे शहराध्यक्ष म्हणजे पोस्टरबॉय
"भाजपा शहराध्यक्षानी शहरात पोस्टरबाजी चालवली आहे. पोस्टर बॉय होण्यापेक्षा त्यांनी तिकिट वाटपाचा हक्क आपल्याकडून का काढून घेतला याचा विचार करावा आणि ते परत मिळवावेत, तरच त्यांना शांत झोप लागेल, असा टोला जगताप यांनी लगावला."