पुणे - सध्या काळात कुणाला कसला छंद लागेल हे सांगता येणार नाही, किंवा याचं भानही ठेवता येणार नाही. पुण्यात एका चोराला चक्क पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या चोरी करण्याचा छंद लागला होता. आतापर्यंत त्याने ७ पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी केल्या होत्या. त्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विवेक वाल्मीक गायकवाड (वय २०, रा. थेरगांव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसानी अटक केल्यानंतर त्याच्याकडून ७ पांढऱ्या मोपेड दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार; विवेक हा मूळचा उस्मानाबाद जिल्हात राहणारा आहे. तो काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. तो कोणतेही काम करत नव्हता. त्याला नवीन गाड्या फिरवण्याचा शॉक होता. त्याही नवीन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या. म्हणून तो पार्किंग मधून नवीन गाड्या चोरायचा, मात्र विकत नव्हता. तो गाड्या फिरवायचा आणि त्या गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार होत असायचा. त्याने चतु:श्रृंगी, वाकड, सांगवी या भागातून या दुचाकी चोरी केल्या होत्या.
शहरात वाहन चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. म्हणून परिमंडळ चार विभागचे उपयुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड, तेजस चोपडे, बाबा दांगडे व त्यांच्या पथकाने चोराचा शोध घेतला. पोलिसानी चोराची पुढची क्लुप्ती शोधत विविध भागात थेट पार्किंगमध्ये ट्रॅप लावला. त्यानुसार, एका सोसायटीत पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे व किशोर दुशिंग यांनी एका पार्किंगमध्ये थांबलेले असतानाच विवेक हा नव्या गाड्यांना चाव्या लावून पाहत असल्याचे दिसले. तत्काळ पोलिसानी त्यांच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी, त्याने ७ गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याने डी-मार्टच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरल्याची माहिती दिली.