म्हणे...घुशी, उंदीर, खेकड्यांनी फोडला कालवा, पाटबंधारे विभागाच्या अजब तर्काला मंत्री गिरीश महाजनांचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 01:34 AM2018-09-29T01:34:44+5:302018-09-29T01:35:09+5:30
खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने आलेल्या जलप्रलयात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुद्धा या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले.
पुणे - खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने आलेल्या जलप्रलयात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुद्धा या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. परंतु, दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्वांचे पंचनामे करून पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेशदेखील त्यांनी या वेळी दिले.
महाजन यांनी शुक्रवारी (दि. २८ सप्टें) रोजी दुपारी दांडेकर पूल येथील दुर्घटना ग्रस्तांची भेट घेतली. भेटीदरम्यान आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
महाजन म्हणाले, हा कालवा फुटण्यापाठीमागे घुशी, उंदीरखेकडाच जबाबदार आहे असे मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केले आहे. ते बरोबर असू शकते.परंतु, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही दुर्घटना अतिशय वेदनादायी आहे. पीडित कुटुंबांना सरकार व महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना पंचनामे करुन लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील महाजन यांनी यावेळी दिले. पीडितग्रस्त कुटुंबांचे महाजन यांनी समस्या जाणून घेताना त्यांचे सांत्वन देखील केले.
कालवाफुटीच्या चौकशीसाठी समिती - गिरीश महाजन
पुणे : पर्वती पायथा येथून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केल्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर संबंधितांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्वती परिसरातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून गुरूवारी पर्वती पायथा परिसर, दांडेकर पुल व सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी भागात पाणी शिरले होते. या भागाची पाहणी जलसंपदामंत्री महाजन यांनी केली. तसेच दुर्घटनाग्रस्त भागातील नागरीकांशीही त्यांनी संवाद साधला. महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र्र निंबाळकर, सहायक आयुक्त गणेश सोनुने, पाटबंधारा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार गीता दळवी या वेळी उपस्थित होते.
जलसंपदामंत्री महाजन यांनी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कालवा फुटलेल्या भागाची पाहणी केली. तसेच, कालवा दुरूस्ती कामाचा आढावा घेतला. कालव्यातील पाण्यामुळे बाधित परिसरातील झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर, कालवा फुटीला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.
मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे पर्वती भागातील सर्व्हे नंबर १३२, १३३, १३० आणि २१४ या भागातील आंबिल ओढ्याच्या तीरावर वसलेल्या झोपड्यांची हानी झाली. ६०० झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाल्या आहेत. तर ८० ते ९० झोपड्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत.
चुकांचा अक्षरश: वाचला पाढा
जलसंपदामंत्री महाजन यांच्यासमोर टिळकांविषयी संताप व्यक्त करताना नागरिकांनी, घटनास्थळी भेट देताना महापौरांनी गांभीर्य न बाळगता उद्भवलेल्या विदारक परिस्थितीवर त्या हसल्या, असे सांगून टिळक यांच्या चुकांचा अक्षरश: पाढाच वाचला.