पुणे : राज्यभर सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत असताना, शिवजयंतीला परवानगी नाकारणे हे दुर्दैव आहे. कोरोनाची काळजी घेऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्यायला हवी होती. एका पक्षाचे अध्यक्ष गावोगाव जाऊन कार्यक्रम, मेळावे घेतात. त्यावर निर्बंध नाहीत. पण, शिवजयंतीला निर्बंध घातले जात असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १९) झाला़ त्या वेळी ते बोलत होते. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजयुमो पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अभिव्यक्त होणाऱ्या लोकांवर बंदी घालण्याची भाषा निंदनीय आहे. एल्गार परिषद होते. मात्र, पोवाडे चालत नाहीत. हिंदू धर्म हा सहनशील आणि सहिष्णू असल्याने सर्वधर्मसमभावाचे धडे देण्याचे केविलवाणे प्रयत्न अनेकजण करतात. त्यामुळे जाज्वल्य हिंदुत्व या युवाशक्तीमध्ये बिंबवण्याचा काम होण्याची आवश्यकता असल्याचेही पाटील यांनी सांगितले़
चौकट
“करिअर आणि कौटुंबिक जीवनात व्यग्र झालेल्या तरुणांचे देशाशी, समाजाशी नाते जोडण्याचे काम ‘युवा वॉरियर्स’च्या माध्यमातून व्हावे. त्यांच्यात राजकीय, सामाजिक भान आणि जाणीव वाढावी. समाजात आजूबाजूला अनेक अडचणी, प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार युवकांनी केला पाहिजे,” अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली़
-------------------------
फोटो मेल केला आहे़