जैन धर्मियांचा चातुर्मास चतुर्दशीपासुन सुरू होतो. त्यानुसार शुक्रवार (ता.२३)पासुन सुरवात होत आहे. त्यासाठी, मंदिरमार्ग आणि स्थानकवासी अशा दोन्ही पंथांच्या बांधवांनी मंदिर आणि स्थानकांमध्ये आवश्यक ती तयारी केली आहे. आचार्य नंदीवर्धनसागरसुरीश्वरजी, उपप्रवर्तक तारकऋषीजी, गणिवर्य वैराग्यरतिविजयजी, आचार्य विमलबोधीजी, हर्षसागरसुरीजी, लाभेशविजयजी, जितेशमुनीजी, विश्वासमुनीजी, साध्वीजी मधुस्मिताजी, नमिताजी, सुमनप्रभाजी आदी साधुसंतांचेशहरातील मंदिर आणि स्थानकांमध्ये आगमन झाले आहे.
कोरोनामुळे, धार्मिक कार्यक्रमांबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. प्रार्थना, प्रवचन, मांगलीक, प्रतिक्रमण आदी कार्यक्रमांसाठी गर्दी होणार नाही, अशा प्रकारे श्रावक संघांनी नियोजन केले आहे. त्यानुसार भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघाच्या अध्यक्षांनी भाविकांना केले आहे. काही ठिकाणी झुमलिंकवर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरूपोर्णिमेनिमित्त, शनिवारी, गुरूगुणगाण, गुरूवंदना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.