पुणे : जैश-ए-मोहम्मद समुद्रमार्गे हल्ल्याची तयारी करत असून त्या प्रकारचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिले जात आहे. या बाबतची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. मात्र, सर्व हल्ले रोखण्यास भारतीय नौदल सज्ज आहे, अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्रविभाग व लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या धनवंतरी सभागृहात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.सिंग म्हणाले, सहा दहशतवादी समुद्रामार्गे देशात घुसल्याची आणि समुद्रामार्गे हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागामार्फत मिळाली आहे. यामुळे आम्ही समुद्रात टेहळणी वाढवली आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याची प्रमुख जबाबदारी नौदलाची आहे. समुद्रसीमांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल, कोस्टगार्ड, राज्यशासन यांच्यात समन्वय साधून एकत्र काम केले जात आहे. जागतिक महासत्ता होण्याची चीनची महत्वाकांक्षा आहे. यामुळे हिंद महासागरात त्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले.नौदलाच्या निधीत वाढ होणे गरजेचेनौदलाला २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात १८ टक्के वाटा मिळत होता. मात्र, हा निधी आता १३ टक्यांवर आला आहे. सध्याची सागरी सुरक्षेची आव्हाने बघता त्यात वाढ होणे गरजेचे आहे,’’ असे विचार अॅडमिरल सिंग यांनी व्यक्त केले. सध्याची भारतीय नौदलाची परिस्थिती पाहता तीन विमानवाहू युद्ध नौका असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने युद्धपोत बनविण्याचा वेग वाढवावा लागणार आहे.
समुद्रमार्गे भारतात हल्ला करण्याची जैशची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 4:49 AM