जय हो! 'प्राण' घेऊन पुण्यात पोहचली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' ; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:48 AM2021-05-12T00:48:55+5:302021-05-12T00:52:55+5:30
पुणे विभागात दाखल झालेली ही पहिलीच तर महाराष्ट्रसाठी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस ठरली.
प्रसाद कानडे-
पुणे: अवघ्या 37 तासांत 1725 किमीचे अंतर पार करीत अंगुल हुन निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास लोणीत दाखल झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर दिला असल्याने केवळ क्रु (चालक व गार्ड) बदलण्यासाठी ही गाडी केवळ 5 मिनिटं थांबत.अन लगेच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत. रो रो सेवेद्वारे चार टॅन्कर आणण्यात आले. यातून 55 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक झाली. पुणे विभागात दाखल झालेली ही पहिलीच तर महाराष्ट्रसाठी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस ठरली.
अंगुल (ओरिसा ) येथून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चार टॅन्कर नागपूर च्या दिशेने रवाना झाले. मंगळवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटंनी नागपूर स्थानकवर गाडी दाखल झाली. क्रु बदलुन तात्काळ ही गाडी लोणी साठी 6 वाजून 30 मिनीटांनी मार्गस्थ झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर असल्याने मार्गात गाडीला सर्वच सिग्नलवर ग्रीन सिग्नल देण्यात आला.त्यामुळे गाडीची गती जरी कमी असली तरीही ग्रीन कॉरिडॉर मुळे वेळेत मोठया प्रमाणात बचत केली गेली.
शंटिंग लाईन जोडले रॅम्प :
लोणी स्थानकावरील इंजीन च्या शंटिंग लाईन ला जोडूनच नव्याने रॅम्प तयार करण्यात आले. याच लाईन वर ऑक्सिजन एक्सप्रेस आणण्यात आली.यावेळी येथे लाईट ची सोय देखील करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनासह, जिल्हा प्रशासनचे अधिकारी उपस्थित होते.
हवा भरण्यासाठी एक तास
टँकरची वाहतूक करताना सुरक्षेच्या कारणास्तव टॅन्कर च्या चाकातील हवा काढून टाकली जाते.गाडी रॅम्प वर उतरून घेताना पुन्हा हवा भरावी लागते.हवा भरण्यासाठी चार कम्प्रेसर ची सोय करण्यात आली. शिवाय कम्प्रेसर रुळा जवळून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले तर त्या साठी दोन रिक्षा देखील आणून ठेवण्यात आल्या होत्या. एका टँकर मध्ये हवा भरण्यासाठी किमान एक तास लागला.