जेईई, नीट, नेट परीक्षा- २०२४ चे वेळापत्रक जाहीर, 3 आठवड्यात निकाल हाेणार जाहीर
By प्रशांत बिडवे | Published: September 19, 2023 04:29 PM2023-09-19T16:29:23+5:302023-09-19T16:31:04+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जेईई तसेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (नीट युजी ) परीक्षा देण्यासाठी देशभरातून माेठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करीत असतात....
पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे पुढील वर्षी हाेणाऱ्या जेईई, नीट, सीयुईटी आणि नेट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जेईई तसेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (नीट युजी ) परीक्षा देण्यासाठी देशभरातून माेठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करीत असतात.
देशभरात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने देशभरात महत्वाच्या प्रवेश परीक्षांचे आयाेजन केले जाते. त्यासाठी या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई परीक्षेला खूप महत्व आहे. ऑनलाईन माध्यमातून या परीक्षा हाेतात. जेईई परीक्षेचा पहिले सेशन दि. २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी आणि दुसरे सेशन दि. १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा ५ मे २०२४ राेजी नियाेजित आहे.
देशातील केंद्रीय विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयुईटी युजी) दि. १५ ते ३१ मे दरम्यान होईल. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची (सीयुईटी पीजी) परीक्षा दि. ११ ते २८ मार्च या कालावधी घेतली जाईल. प्राध्यापक हाेण्यासाठी महत्वाची असलेली युजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले असून ही परीक्षा दि. १० ते २१ जून दरम्यान परीक्षा होणार आहे. परीक्षांविषयी अधिक माहितीसाठी https://nta.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. नाेंदणीप्रक्रिया सुरू झाल्यानंतर परीक्षांविषयी सविस्तर प्रसिद्ध केली जाईल.
तीन आठवड्यात निकाल जाहीर हाेणार-
परीक्षा समाप्त झाल्याच्या दिवसापासून पुढील तीन आठवड्यांत निकाल जाहीर केले जातील. तसेच नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल असेही एनटीएच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.