जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा काल जल्लोषात साजरा झाला. तब्बल १८ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती दिली.
नवरात्राची सांगता आणि घराघरांतील घट उठल्यानंतर गुरुवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरीगड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडाºयाच्या उधळणीत खांदेकरी मानकºयांनी देवाच्या उत्सवमूर्तीची पालखी उचलली, भंडाºयाच्या उधळणीत देवाच्या जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडारगृहातून देवाच्या उत्सवमूर्ती सेवेकºयांनी पालखीत ठेवल्या, सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. यावेळी गडाच्या सज्जातून भाविकांनी मुक्त हस्ताने भंडाºयाची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप आले होते.
मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ७.३० च्यादरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, आबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खांदेकºयांची, तसेच भाविकांची चांगलीच धांदल उडाली होती. संपूर्ण डोंगरउतारावर सोहळा रंगणार असल्याने पावसाचा व्यत्यय येतोय की काय, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अर्ध्या तासाने पावसाने उघडीप दिल्याने सोहळ्याला सुरुवात झाली.
दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंडभैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सवमूर्तींचा पालखी सोहळाही सीमोल्लंघनासाठी निघाला. दोन्ही मंदिरामध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्हीकडील विश्वस्त मंडळांकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय केली होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरीलविद्युत रोषणाई मनमोहक दिसत होती, दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती. रात्रीच्या वेळी या सोहळ्यातील जल्लोष मर्दानी अनुभूती देत होता. यातच उत्सवमूर्तींच्या पालख्यासमोर होणाºया विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते.
शोभेच्या दारूकामाच्या लख्ख प्रकाशात जेजुरीगडाची पालखी डोंगरउतारावरून खाली दरीत रमण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. पूर्णपणे डोंगराळ भाग असल्याने खांदेकºयांना पालखी सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यांच्या मदतीला धावणाºया हातांनाही चढउतारावर कसरत करावी लागत होती. मात्र उत्सवाचा जल्लोष आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सारे काही सहजगत्या चालू होते. यावेळी वीरश्रीचा वेगळाच अनुभव उपस्थित भाविकांना येत होता. मर्दानी दसरा सण काय असतो, याचा अनुभव भाविकांना येत होता. देहभान हरपून भाविक उत्सवाची अनुभूती घेत होते. मध्यरात्री जेजुरीगडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठारच्या सोहळ्याने सुसरटिंगी टेकडी सर केली, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रचंड शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सवमूर्तींची देवभेट उरकली अन् सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.
देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर जेजुरीगडाच्या पालखीचा सीमोल्लंघनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. रमण्यातील तळ्याकाठी सोने लुटून भाविकांनी उत्सवमूर्तींना अर्पण करून दसºयाचे पारंपरिक महत्त्व जपले. सोहळ्याने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीमार्गे गावात प्रवेश केला. ठिकठिकाणचे औक्षण स्वीकारत सोहळा जेजुरी नगरपालिका पटांगणावर पोहोचला. या ठिकाणी रावणदहन करण्यात आले. तेथून सोहळा मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. वाटेत घराघरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले.
सकाळी ८ वाजता पालखी सोहळा गडाच्या पायºयांची चढण चढून गडावर पोहोचला. सोहळ्यासमोरील सनई चौघडा, धनगरी ओव्या, सुंबरान, लोककलावंतांची भक्तिगीते, लावण्या, देवाची गाणी व नृत्य होत असल्याने विजयी उन्माद चांगलाच जाणवत होता. भांडारगृहात उत्सवमूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा, विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडे, अॅड. प्रसाद शिंदे, अॅड. तुषार सहाणे, अॅड. अशोक संकपाळ, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, समस्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यावेळी उपस्थित होते.