येळकोट येळकोट जय मल्हार! पहाटेपासून जेजुरीगड भाविकांसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 09:57 AM2020-11-16T09:57:03+5:302020-11-16T09:59:40+5:30
Jejuri : कोविड महामारीमुळे राज्यभरातील धार्मिक स्थळे, मंदिरे देव दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. गेली आठ महिने मंदिरे बंद होती.
पुरंदर - कोविडमुळे गेल्या आठ महिन्यापासून महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडोबा गड भाविकांसाठी बंद करण्यात आला होता. आजपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जेजुरीगड भाविकांसाठी देव दर्शनासाठी खुले करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीतच भाविकांना देव दर्शन घ्यावे लागणार असल्याचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले. पहाटे साडे पाच वाजता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक कुलदैवत खंडोबाची महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
कोविड महामारीमुळे राज्यभरातील धार्मिक स्थळे, मंदिरे देव दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. गेली आठ महिने मंदिरे बंद होती. मंदिरे खुली करावी अशी भाविकांची मागणी होती. यावर काही राजकीय पक्षानेही आंदोलने केली होती. मात्र कोविड सदृश्य परिस्थितीमुळे शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. मात्र दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ज्या ठिकाणी कोविड ची परिस्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे अशाच ठिकाणची मंदिरे देवदर्शनासाठी शासनाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जेजुरीचे खंडोबा मंदिर आजपासून उघडण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने राज्यभरातून देवदर्शनासाठी येथे भाविक येणार असल्याने मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देव संस्थान वर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. जेजुरीतील कोविड रुग्ण संख्येला आळा घालण्यात येथील प्रशासनाला जरी यश आलेले असले तरी येथे येणाऱ्या भाविकांमुळे भविष्यात साथ पसरू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहेत. येथे देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शासकीय नियम व अटींचे पालन करूनच देव दर्शनाला यावे असे आवाहन मार्तंड देव संस्थान कडून करण्यात आले आहे. यात १० वर्षाखालील मुलांना व ६५ वर्षांवरील भाविकांना तसेच गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही अशांनी जेजुरीला देवदर्शनासाठी येणे टाळावे लागणार आहे
आजपासून जेजुरीत भाविकांची गर्दी सुरू होणार असल्याने मार्तंड देव संस्थानकडून देवदर्शन सुलभ व सुरक्षित व्हावे म्हणून नियोजनही केले आहे. यात जेजुरी गडावर पायात चप्पल घालून येणारे, मास्क न लावलेले भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. जेजुरी गडाच्या मुख्य नंदी चौकात बॅरिकेट्स लावून एकावेळी फक्त १०० भाविकांना गडावर सोडण्यात येणार आहे. त्यानंतर गडकोटाच्या मुख्य प्रवेश द्वारावर सॅनिटायझेशन, आणि ऑक्सिमिटर, थर्मल सकॅनिंग ची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांची तपासणी करूनच त्यांना गडकोटात प्रवेश दिला जाणार आहे.
देव दर्शन घेताना ही सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. भविकाना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. मुख्य मंदिराबाहेरील कासवावरूनच मुख दर्शन घ्यावे लागणार आहे. मुख्य प्रवेश द्वारातून प्रवेश दिल्यानंतर दुसऱ्या दरवाजाने दर्शन घेतलेले भाविकांना बाहेर जावे लागणार आहे. भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची व इतरांच्या ही आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.