पुणे : जेजे रुग्णालयात नेत्रराेग विभागातील २८ निवासी डाॅक्टरांनी ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डाॅ. तात्याराव लहाने, नेत्रराेग विभागाच्या विभागप्रमुख व इतर डाॅक्टरांच्या हुकूमशाही वृत्तीविराेधात आंदाेलन छेडले आहे. आता, यावरून ससूनचे माजी विद्यार्थी डाॅ. संग्राम पाटील यांनीदेखील ससूनमध्येही असाच प्रकार आधीच घडल्याचा आराेप एका व्हिडीओद्वारे केला. पाटील यांच्या व्हिडीओमुळे ससूनसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ‘जे.जे.’ चे लाेण ‘बी.जे.’ पर्यंत आधीच पाेहोचल्याचे दिसून येत आहे.
डाॅ. संग्राम पाटील हे इंग्लंडमध्ये अतिदक्षता विभागतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी. जे. मेडिकल काॅलेज येथे झाले तसेच त्यांची पत्नी यांचेही पदव्युत्तर पदवीचे शिक्षण ‘बी. जे.’तील नेत्रशल्यचिकित्सा विभागात झाले. त्या निवासी डाॅक्टर असताना यादरम्यान त्यांना तत्कालीन विभागप्रमुख, वरिष्ठ डाॅक्टरांचा आलेला अनुभव डाॅ. पाटील यांनी त्यांच्या यु ट्यूबवर व्हिडीओद्वारे मांडला तसेच त्यांनी डाॅ. लहाने यांच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नाेंदवला तसेच डाॅ. लहाने यांच्यावर परदेशातूनच जोरदार टीका केली आहे.
डाॅ. पाटील म्हणाले, त्यांच्या पत्नी बी. जे.मध्ये दाेन वर्ष नेत्रराेग विभागात शिक्षण घेत असताना त्यांना तसेच इतर विद्यार्थ्यांना डाेळ्यांच्या शस्त्रक्रिया करायला दिल्या जात नसायच्या. स्वत: अभ्यास करण्याव्यतिरिक्त पर्याय नसायचा. दाेन वर्षांत केवळ दाेनच वेळा त्यांना माेतीबिंदुची शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली. दुसरीकडे मात्र, इन्स्टिट्यूट स्वत:ची मुले किंवा राजकीय व्यक्तीच्या मुलांना मात्र, शस्त्रक्रिया करण्यासाठी स्पेशल टेबल दिले जात असायचे. त्यांना रेग्युलर शस्त्रक्रिया करायला दिले जायचे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांत जाऊन ही शस्त्रक्रिया शिकावी लागली.
निवासी डाॅक्टर हे रात्रंदिवस वैद्यकीय अभ्यास आणि साेबतच प्रॅक्टिससाठी धडपडत असतात. त्यासाठी त्याला थेराॅटिकलबराेबरच प्रॅक्टिकल म्हणजे तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव मिळणे हे एक निष्णात डाॅक्टर बनण्याची पहिली पायरी असते. परंतु, जे.जे.सह, ससून आणि इतर वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातही अनेकांना ही संधीच दिली जात नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ससूनच्या ‘त्या’ विभागातही फेव्हरिझम?
ससूनमधील नेहमी चर्चेत असलेल्या विभागातही शस्त्रक्रिया करताना असाच फेव्हरिझम हाेत आहे. नव्यानेच आलेले सहयाेगी प्राध्यापक स्वत:चे शस्त्रक्रियांचे रेकाॅर्ड तयार करत जवळपास सर्वच रुग्णांच्या शस्त्रक्रिया स्वत: करतात. त्याचे डाॅक्युमेंटेशनही करत आहेत. परंतु, त्यामुळे निवासी डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची संधीच मिळत नसल्याने ते शस्त्रक्रिया कधी शिकणार? असा प्रश्न उपस्थित करत हे निवासी डाॅक्टर व्यथित झाले आहेत.
‘जेजे’ आणि ‘बीजे’मध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या निवासी डाॅक्टरांना विभागप्रमुखांनी विशेषत: नेत्रशल्यचिकित्सा विभागातील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया शिकविण्यात दुजाभाव केला आहे. तसेच ते विद्यार्थ्यांना हुकूमशहा असल्यासारखे व गुलामासारखी वागणूक देतात हे निंदनीय आहे. हे प्रकार बंद व्हायला हवेत. जेजेमधील निवासी डाॅक्टरांनी याबद्दल आवाज उठवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
- डाॅ. संग्राम पाटील, कन्सल्टंट फिजिशियन, इंग्लंड.